कामगिरी पाहून उमेदवारी देणार
By Admin | Updated: July 18, 2014 01:53 IST2014-07-18T01:30:41+5:302014-07-18T01:53:32+5:30
औरंगाबाद : भाजपाच्या विद्यमान आमदारांची कामगिरी पाहूनच त्यांना उमेदवारी देण्यात येणार आहे.

कामगिरी पाहून उमेदवारी देणार
औरंगाबाद : भाजपाच्या विद्यमान आमदारांची कामगिरी पाहूनच त्यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. पक्षाला ‘अच्छे दिन’ येताच इच्छुकांची उमेदवारी मागण्यासाठी भरती आल्यामुळे ती स्पर्धा रोखण्यासाठी पक्षाने (केआरए) ‘की रिझल्ट एरिया’चे निकष लावून परफॉर्मन्स तपासणीचा निर्णय घेतला आहे, असे प्रदेशाध्यक्ष आ. देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. विद्यमान आमदारांच्या कामाचे आॅडिट (परीक्षण) करण्यात येईल. जे आमदार त्या परीक्षणात खरे उतरणार नाहीत, त्यांचा निर्णय पक्ष संसदीय समिती व बोर्ड घेईल, असेही ते म्हणाले.
भाजपाच्या विभागीय पदाधिकाऱ्यांची बैठक औरंगाबाद जिमखाना येथे पार पडली. सकाळी ८ ते दुपारी ३ पर्यंत झालेल्या त्या बैठकीत सर्व जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यात आली. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना आ.फडणवीस म्हणाले, २५ जुलैपर्यंत पक्षाचे संघटन, १०० टक्के बुथ बांधणी पूर्ण होईल. त्यानंतर १ मंत्री एका विधानसभा मतदारसंघात एक दिवस फिरून आढावा घेईल. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, विधान परिषद विरोधी पक्षनेते आ. विनोद तावडे, आ. पंकजा पालवे, आ. संभाजी निलंगेकर, आ. सुधीर मुनगंटीवार, सुजितसिंह ठाकूर, गणेश हाके, माजी आ. हरिभाऊ बागडे, शिरीष बोराळकर, भगवान घडामोडे आदींची पत्रपरिषदेला उपस्थिती होती.
राज्य शासनाने मुस्लिम समाजाला दिलेल्या आरक्षणावर भाजपाने आक्षेप घेतला आहे.
महायुतीच्या बाबतीत किंवा एकमेकांच्या पक्षाबाबत उलटसुलट वक्तव्ये करू नयेत. आमच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांनाही तसेच सांगितले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जे बोलतील तेच अधिकृत मानले जाईल.
सरकारचे निर्णय बदलू
निवडणुकीच्या तोंडावर सरकारने घाई घाईने जे निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे ते सर्व निर्णय महायुतीचे सरकार येताच बदलून टाकू. काँग्रेसचे माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांच्यावर अपसंपदेप्रकरणी कारवाई करण्यासाठी अध्यक्षांच्या परवानगीची गरज कशासाठी आहे. त्यांना क्लीन चीट देण्यासाठीच ही उठाठेव सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
१५ आॅगस्टनंतर पहिली यादी
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली आहे. महायुती अभेद्य राहणार आहे. युती तुटणार नाही. ६ पक्ष महायुतीमध्ये असून, नवीन कोणताही पक्ष आता या युतीमध्ये येणार नाही.
महायुतीसोबत जागा वाटपाची चर्चा होऊन १५ ते २० आॅगस्टदरम्यान भाजपाची पहिली उमेदवार यादी जाहीर होईल. महायुतीला अनुकूलता आहे. मोठ्या प्रमाणात यश मिळेल, असा दावा करीत आ. फडणवीस म्हणाले, लोकसभेत अनेक विधानसभा मतदारसंघात भाजपाला यश मिळाले आहे.
मराठवाड्यातही मोठ्या प्रमाणात यश मिळवू. मराठवाड्यात भाजपाच्या वाट्याला उचित जागा येतील. जागा बदलणे, वाढवून मागणे, फेरबदल करणे याबाबत महायुतीच्या बैठकीत निर्णय होईल. मुंडे यांच्या निधनानंतर पोकळी निर्माण झाली आहे. आ. पंकजा पालवे कोअर कमिटीमध्ये असून, त्यांच्या माध्यमातून मुुंडेंचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.