भाजपा कार्यकर्त्यांना सन्मान मिळवून देणार
By Admin | Updated: May 20, 2015 00:18 IST2015-05-20T00:12:04+5:302015-05-20T00:18:04+5:30
उस्मानाबाद : सेना-भाजपा राज्यात मोठ्या ताकदीने सरकार चालवित आहे. ज्या जिल्ह्यात सेनेचा पालकमंत्री आहे, तेथे भाजपाच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना मान-सन्मान मिळत नव्हता.

भाजपा कार्यकर्त्यांना सन्मान मिळवून देणार
उस्मानाबाद : सेना-भाजपा राज्यात मोठ्या ताकदीने सरकार चालवित आहे. ज्या जिल्ह्यात सेनेचा पालकमंत्री आहे, तेथे भाजपाच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना मान-सन्मान मिळत नव्हता. त्यामुळेच अशा जिल्ह्यांत भाजपाने संपर्क मंत्री नियुक्त केले आहेत. उस्मानाबादची जबाबदारी माझ्यावर असून, यापुढील काळात जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांना योग्य तो सन्मान मिळवून देवू, असे गृह राज्यमंत्री तथा भाजपाचे जिल्हा संपर्क मंत्री प्रा. राम शिंदे यांनी सांगितले.
येथील शासकीय विश्रामगृहात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. समवेत जिल्हाध्यक्ष नितीन काळे, राज्य कार्यकारिणी सदस्य संजय निंबाळकर, अॅड. मिलिंद पाटील, माजी आ. गोविंद केंद्रे, अॅड. खंडेराव चौरे, संजय पाटील दुधगावकर आदींची उपस्थिती होती. तळागाळातील भाजपा कार्यकर्ते निष्ठेने पक्षसेवा करीत आहेत. या कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. अनसुर्डा येथे ११ दलित कुटुंबांवर बहिष्कार घातल्यासंबंधी आपण अधिक माहिती घेत असून, या संदर्भातही योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
कनगरा येथे ग्रामस्थांवर पोलिस अत्याचार झाले होते. या प्रकरणी कोणावरही कारवाई झाली नसल्याचा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित केला असता विश्वास नांगरे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. विस्तारित शहर पोलीस ठाण्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित झाला. या पोलिस ठाण्यासाठीची भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी पाठपुरावा करू. तसेच पोलिस कर्मचाऱ्यांसाठी म्हाडाच्या माध्यमातून स्वतंत्र वसाहत उभारण्याचेही आपले प्रयत्न राहतील, असे ते म्हणाले.
मागील काही महिन्यांत उस्मानाबाद शहर आणि परिसरात गुन्ह्यांची संख्या वाढली आहे. वाढती गुन्हेगारीही पोलिसांच्या आवाक्याबाहेर जात असून, पोलिस अधीक्षकही याबाबत गंभीर नसल्याचे पत्रकारांनी सांगितले असता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याला आपले प्राधान्य राहील. मी जिल्ह्याचा आढावा घेत असल्याचे प्रा. राम शिंदे यावेळी म्हणाले. (प्रतिनिधी)