दुधनाच्या पाण्याचा शेतकर्यांना लाभ द्या
By Admin | Updated: June 1, 2014 00:25 IST2014-06-01T00:10:19+5:302014-06-01T00:25:11+5:30
मोहन बोराडे, सेलू निम्नदुधना प्रकल्पात यावर्षी मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा करण्यात आला आहे़
दुधनाच्या पाण्याचा शेतकर्यांना लाभ द्या
मोहन बोराडे, सेलू निम्नदुधना प्रकल्पात यावर्षी मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा करण्यात आला आहे़ यामुळे दुधना काठावरील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग होण्यासाठी दुधना पात्रात पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली आहे़ यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे निम्नदुधना प्रकल्पात ६० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाला़ प्रकल्पात पाणी अडविल्यामुळे दुधना नदीचे पात्र कोरडेठाक राहिले़ परिणामी दुधना काठावरील गावांना पाणीटंचाईचा फटका बसत आहे़ दुधना काठावरील गावांना नदी पात्रातून पाणीपुरवठा करण्यात येतो़ अनेक गावांना पाणीपुरवठा करणार्या विहिरी पात्रात घेण्यात आलेल्या आहेत़ यावर्षी पात्र कोरडे राहिल्यामुळे पाणीपुरवठा करणार्या विहिरींची पाणीपातळी काही दिवसांपासून खालावली आहे़ परिणामी पाणीपुरवठा करण्यास ग्रामपंचायतींना अडचणी निर्माण झालेल्या आहेत़ दुधना काठावरील पिंपरी खुर्द, पिंपरी बु़, शिराळा, खुपसा, खेर्डा, रोहिणा, हादगाव पावडे, गोमे वाकडी, मोरेगाव, हादगाव आदी गावच्या ग्रामपंचायतींनी ठराव घेऊन दुधना प्रकल्पातून नदी पात्रात पाणी सोडण्याची मागणी केली आहे़ बारा महिने दुधना पात्र कोरडे पडल्यामुळे दुधना काठावरील गावांमध्ये पाणी पातळीत घट झाली आहे़ त्यामुळे दुधना प्रकल्पातून पाणी सोडावे, अशी मागणी या ग्रामपंचायतींची आहे़ दरम्यान, दुधना काठावरील बहुतांशी ग्रामपंचायतींनी पाणीपट्टी भरण्याची तयारी दर्शविली आहे़ त्यामुळे पाणीटंचाई व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघावा या हेतुने दुधनातून पाणी सोडावे, अशी शेतकर्यांची मागणी आहे़ धरणातील पाणी दुधना नदीत सोडल्याने नागरिकांना दुहेरी फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे़ पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न तालुक्यातील काही गावांमध्ये निर्माण होणार आहे़ ही संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन पाणी सोडण्याची मागणी सदरील ग्रामपंचायतींच्या वतीने करण्यात आली आहे़ या पाण्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचन, जनावरांसाठी पिण्याचे पाणी व चार्याचाही प्रश्न थोड्याफार प्रमाणात मार्गी लागणार असल्याचे दुधना नदीकाठावरील गावकर्यांचे म्हणणे आहे़ दुधना प्रकल्पात पाणीसाठा असतानाही दुधना काठावरील गावे तहानलेली आहेत़ जनावरांचा चार्याचा प्रश्नही बिकट आहे़ दुधना नदीत पाणी सोडले तर जनावरांच्या पाण्याचा प्रश्न व विहिरींच्या पाण्याची पातळी वाढते़ अनेक महिने वाळू असल्यामुळे पाणीपातळी कायम राहते़ यामुळे पाणी मिळावे, अशी अपेक्षा शेतकर्यांना आहे़ गारपिटीमुळे ज्वारीचा कडबा काळा पडला आहे़ परिणामी जनावरे कडबा खात नाहीत़ दुधनात पाणी सोडले तर शेतकरी जनावरांचा चारादेखील लावू शकतात़ यामुळे पाणी सोडण्याची मागणी आहे़