दहावी परीक्षेत मुलीच अव्वल
By Admin | Updated: June 14, 2017 00:31 IST2017-06-14T00:31:03+5:302017-06-14T00:31:39+5:30
जालना : मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी आॅनलाइन जाहीर झाला

दहावी परीक्षेत मुलीच अव्वल
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी आॅनलाइन जाहीर झाला. जिल्ह्याचा एकूण निकाल ८९.९० लागला असून, यामध्ये अपेक्षेप्रमाणे मुलींनी बाजी मारली. मुलींचा एकूण निकाल ९२.९० टक्के असून, मुलांचा निकाल ८७.७७ टक्के आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा दहावीच्या निकालात अर्ध्या टक्क्याने घट झाली आहे.
यंदा सात मार्च ते एक एप्रिल २०१७ दरम्यान दहावीची परीक्षा घेण्यात आली. जालना शहरासह जिल्ह्यातील ३७० शाळांमधून तीस हजार २३० विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यामध्ये १७ हजार ६५१ मुलींनी तर १२ हजार ५७९ मुलींनी परीक्षा दिली. पैकी एकूण २७ हजार १७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये १५ हजार ४९२ मुले तर ११ हजार ६८६ मुली आहेत. जालना शहरातील बहुतांश शाळांनी आपल्या यशाची परंपरा कायम ठेवली आहे. जिल्ह्यातील ५४ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. तालुकानिहाय निकालात भोकरदन तालुका पहिल्या क्रमांकावर आहे. त्याखालोखाल जाफराबाद, परतूर, मंठा, बदनापूर, अंबड, घनसावंगी आणि जालना तालुक्याचा क्रमांक आहे. दरम्यान, दहावीचा निकाल मंगळवारी आॅनलाइन जाहीर करण्यात आला असला, तरी शहरातील अनेक शाळांमध्ये सकाळी अकरा ते एक या वेळेत विद्यार्थ्यांची गर्दी दिसून आली. अनेक विद्यार्थ्यांनी स्मार्टफोनवर निकाल पाहण्यास पसंती दिली तर काहींनी इंटरनेट कॅफेवर जाऊन आपल्या निकालाची आॅनलाईन प्रत घेतली. अपेक्षेप्रमाणे निकाल लागलेल्या अनेक मुला-मुलींच्या चेहऱ्यावरुन आनंद ओसंडून वाहत होता. यशस्वी मुलासंह पालकांनी पेढे वाटून निकालाचा आनंद द्विगुणित केला.