जिंतूर तालुक्यात बारावी परीक्षेत मुलींनी मारली बाजी
By Admin | Updated: June 3, 2014 00:42 IST2014-06-03T00:30:52+5:302014-06-03T00:42:11+5:30
जिंतूर: तालुक्याचा निकाल ९१.६१ टक्के एवढा लागला असून मुलींचे उत्तीर्णचे प्रमाण ९४.११ टक्के तर मुलांचे ९०.५५ टक्के आहे.

जिंतूर तालुक्यात बारावी परीक्षेत मुलींनी मारली बाजी
जिंतूर: तालुक्याचा निकाल ९१.६१ टक्के एवढा लागला असून मुलींचे उत्तीर्णचे प्रमाण ९४.११ टक्के तर मुलांचे ९०.५५ टक्के आहे. तालुक्यातून तीन शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तालुक्यामध्ये २ हजार १७४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ हजार १६९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये १५२४ विद्यार्थी व ६४५ विद्यार्थिनी आहेत. यापैकी १९८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून १३८० विद्यार्थी व ६०७ विद्यार्थिनींचा समावेश आहे. विद्यार्थ्यांचे उत्तीर्णाचे प्रमाण विद्यार्थिनीपेक्षा कमी आहे. तालुक्यामध्ये २७ कनिष्ठ महाविद्यालय आहेत. त्यापैकी तीन शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. ९० टक्केपेक्षा जास्त निकालांच्या शाळा १७ आहेत. तालुक्यामध्ये मुलींचे निकालाचे प्रमाण सलग तिसर्या वर्षीही जास्त राहिले आहे. ऊर्दू शाळांमध्ये नॅशनल उर्दू कनिष्ठ महाविद्यालय जिंतूरचा ९२ टक्के निकाल लागला आहे. तालुक्यातील केवळ स्वामी विवेकानंद शेवडी वगळता २६ महाविद्यालयांचा निकाल ८० टक्के पेक्षा जास्त आहे. ज्ञानेश्वर कनिष्ठ महाविद्यालय जिंतूर (९२ टक्के), ज्ञानोपासक जिंतूर (९२.२४ टक्के), श्रीमती शकुंतलाबाई कदम कनिष्ठ महाविद्यालय बोरी (९७.१३ टक्के), साईबाबा येलदरी (९४.२९ टक्के), महात्मा फुले वस्सा (९६.८८ टक्के), साईबाबा इटोली (९४.७४ टक्के), संत जनार्दन चारठाणा (९१.९६ टक्के), नॅशनल ऊर्दू जिंतूर (९२ टक्के), बसवेश्वर बोरी (८९.२६ टक्के), स्वामी विवेकानंद जिंतूर (८९.२३ टक्के तालुक्यात सर्वात कमी स्वामी विवेकानंद निवासी शेवडी (३३.३३ टक्के), श्रीमती शकुंतलाबाई बोर्डीकर जिंतूर (८९.१९ टक्के), जवाहर वझर (९७.३० टक्के), छत्रपती शिवाजी (८६.११ टक्के), संत भगवान बाबा इटोली (९७.५० टक्के), संत तुकाराम धानोरा बु. (८९.५३ टक्के), कै. उत्तमराव जोगवाडकर निवासी चारठाणा (९६.१० टक्के), शंकर नाईक गडदगव्हाण (९१.८९ टक्के),ब्रह्मेश्वर बामणी (८०.५८ टक्के), जवाहर जिंतूर (८१.४८ टक्के), शारदा आडगाव (९७.८३ टक्के), विलासराव देशमुख जिंतूर (९७.४४ टक्के), संत तुकाराम जोगवाडा (९० टक्के), ज्ञानोपासक बोरी (८९.५३ टक्के) निकाल लागला आहे. बारावी परीक्षेत निकालाचे प्रमाण मागील तीन वर्षांपासून चांगले राहिले आहे, असे असले तरी विद्यार्थ्यांचे निकालाचे प्रमाण सतत घसरत आहे. अनेक महाविद्यालय केवळ नावालाच सुरू असून गुरुकूल, निवासी शाळांमधून विद्यार्थ्यांना परीक्षेला बसविले जाते, असाच प्रकार जिंतूर तालुक्यातील तीन ते चार महाविद्यालयातून झाला आहे. या महाविद्यालयांचे निकालही चांगले लागले आहेत. काही महाविद्यालयाच्या इमारतीवर केवळ फलक दिसून येतो. विद्यार्थी मात्र जिल्ह्याच्या ठिकाणी गुरुकूल किंवा निवासी शाळेत शिकत असल्याचे दिसतात. तालुक्यातील ज्ञानोपासक महाविद्यालय जिंतूरच्या ४९० पैकी ४५२ विद्यार्थ्यांनी यश मिळविले. शकुंतलाबाई बोर्डीकर बोरीच्या १७४ पैकी १६९ विद्यार्थ्यानी, संत जनार्दन चारठाणाच्या १९९ पैकी १८३ विद्यार्थ्यांनी, बसवेश्वर बोरीच्या १४९ पैकी १३३ विद्यार्थ्यांनी, श्रीमती शकुंतलाबाई बोर्डीकर जिंतूरच्या १११ पैकी ९९ विद्यार्थ्यांनी, संत तुकाराम धानोराच्या १७२ पैकी १५४ विद्यार्थ्यांनी, ब्रह्मेश्वर बामणीच्या १२९ पैकी १०६ विद्यार्थ्यांनी यश मिळविले. विद्यार्थी संख्या जास्त असतानाही या महाविद्यालयांनी मिळविलेले यश उज्ज्वल आहे. जिंतूर तालुक्यातील २७ कनिष्ठ महाविद्यालयांपैकी तीन शाळांचा निकाल १०० टक्के लागला. यामध्ये प्रभूकृपा वाघी या शाळेचे १७ विद्यार्थ्यांपैकी १७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. साईकृपा बोरीचे पाच पैकी पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर कै. गणेशराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय भोगावच्या ९ पैकी ९ विद्यार्थ्यांनी यश मिळविले. या शाळांचा निकाल कागदावर १०० टक्के वाटत असला तरी प्रत्यक्षात विद्यार्थ्यांची संख्या अगदीच नगण्य आहे. तालुक्यामध्ये सर्वात कमी निकाल स्वामी विवेकानंद निवासी कनिष्ठ महाविद्यालय शेवडीचा लागला असून या महाविद्यालयाने केवळ तीन विद्यार्थ्यांना परीक्षेला बसविले होते. त्यापैकी केवळ एक विद्यार्थी उत्तीर्ण झाला. निकालाचे प्रमाण ३३.३३ टक्के एवढे आहे.