छत्रपती संभाजीनगर : रात्री अपरात्री मुलांसोबत फिरायला जात असल्याच्या कारणावरून एका मैत्रिणीने तिघींसोबत बोलणे बंद केले. मात्र, या आरोपावरून बेबनाव होत चार सुशिक्षित तरुणींमध्ये गुन्हेगारांच्या टोळीप्रमाणे तुंबळ हाणामारी होत एकमेकांवर थेट धारदार कटरने वार केले. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात दोन्ही गटांच्या परस्परविरोधी तक्रारींवरून गुन्हे दाखल केल्याचे पाेलिस निरीक्षक अतुल येरमे यांनी सांगितले.
२० वर्षीय माधुरी, अनाया व केतकी (नावे बदलली आहेत) नामांकित महाविद्यालयात बी.कॉम.च्या द्वितीय वर्षाचे शिक्षण घेतात. माधुरी व केतकीची उस्मानपुऱ्यात राहणाऱ्या अनायाची मैत्रीण सृष्टीसोबत मैत्री झाली होती. ८ जुलै रोजी अनायाच्या वाढदिवसाच्या पार्टीत सृष्टी व अनायामध्ये कडाक्याचे भांडण झाले. तेव्हापासून तिघींनी सृष्टीसोबत बोलणे बंद केले. त्या रागातून सृष्टीने रात्री अपरात्री माधुरीला कॉल करून शिवीगाळ करणे सुरू केले होते. २२ जुलै रोजी रात्री माधुरी, अनाया, केतकीने उस्मानपुऱ्यातील सृष्टीचे घर गाठले. तेथे त्यांच्यात मित्र, मैत्रिणींमधील जुने वाद उफाळून येत हाणामारी सुरू झाली. माधुरीच्या आरोपानुसार, सृष्टीने तिघींवर कटरने वार केले. तिच्या आईने देखील आम्हाला मारहाण करून जखमी केले.
सृष्टीचेही गंभीर आरोपबीबीएच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या सृष्टीच्या जबाबानुसार, २०२२ मध्ये इव्हेंट मॅनेजमेंटच्या कामादरम्यान पुण्यात तिची तिघींसोबत ओळख झाली होती. सहा महिन्यांपूर्वी ती शहरात आल्यानंतर अनायादेखील शहरात येऊन तिच्याच घरी राहत होती. मात्र, रात्री अपरात्री मुलांसोबत फिरत असल्याने तिच्या आईने अनायाला घर सोडायला लावले. त्यावरून अनाया सातत्याने सृष्टीला धमकावत होती. २२ जुलै रोजी रात्री माधुरी, अनाया व केतकीने तिचे घर गाठत मारहाण करत कटरने तिच्यावर वार केले. या घटनेमुळे उस्मानपुऱ्यात धिंगाणा झाला. घटनेची माहिती कळताच निरीक्षक अतुल येरमे यांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर चौघींना रुग्णालयात दाखल करून गुन्हे दाखल केले.