१३ कोटींतून मुलींचे वसतिगृह
By Admin | Updated: April 27, 2015 01:00 IST2015-04-27T00:46:55+5:302015-04-27T01:00:20+5:30
लातूर : १ हजार प्रवेश क्षमता असलेल्या वसतिगृहाच्या वास्तूनंतर आता सामाजिक न्याय भवनाच्या दोन एकर जागेत खास मुलींसाठी १२ कोटी ७४ लाखांतून वसतिगृहाच्या दोन भव्य वास्तू साकारत आहेत

१३ कोटींतून मुलींचे वसतिगृह
लातूर : १ हजार प्रवेश क्षमता असलेल्या वसतिगृहाच्या वास्तूनंतर आता सामाजिक न्याय भवनाच्या दोन एकर जागेत खास मुलींसाठी १२ कोटी ७४ लाखांतून वसतिगृहाच्या दोन भव्य वास्तू साकारत आहेत. जिल्ह्यातील २२ पैकी १५ वसतिगृहांना स्वत:च्या इमारती असून, दोन वसतिगृहांचे काम सुरू आहे. तर दोन वसतिगृहांसाठी जागा खरेदी करण्यात आली आहे. त्यामुळे आता केवळ तीन वसतिगृहांना स्वत:च्या इमारतीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
सामाजिक न्याय विभागाची जिल्ह्यात २२ वसतिगृहे आहेत. लातूर शहरात १ हजार क्षमतेच्या वास्तूमध्ये मुला-मुलींचे प्रत्येकी दोन वसतिगृह आहेत. शहरातील अन्य दोन मुलींच्या वसतिगृहासाठी स्वत:ची इमारत नव्हती. भाड्याने घेतलेल्या इमारतीत मुलींच्या राहण्याची सोय करण्यात आली आहे. मात्र आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या साडेसहा एकर जागेतील दोन एकर जागेमध्ये मुलींच्या दोन वसतिगृहांसाठी दोन वास्तू तयार होत आहेत. प्रत्येकी ६ कोटी ४० लाख रुपये खर्च करून दोन वास्तू तयार केल्या जात आहेत. तळमजल्यासह दोन मजल्यांची सामाजिक न्याय भवनाच्या वास्तूला शोभेल अशाच याही वास्तू डालडा फॅक्टरीच्या जागेत साकारत आहेत. शासनाने समाजकल्याण विभागाला हा निधी वितरीत केला असून, सामाजिक न्याय विभागाकडून वास्तूचा आराखडाही तयार करण्यात आला आहे.
लातूर तालुक्यातील ६, औसा २, निलंगा २, उदगीर २, अहमदपूर २, रेणापूर १ अशा १५ वसतिगृहांच्या इमारती सामाजिक न्याय भवनाच्या जागेत आहेत. आता लातूर शहरात वसतिगृहासाठी दोन वास्तू तयार होत आहेत. राज्य शासनाकडून प्रती वास्तूसाठी ६ कोटी ४० लाख रुपये असे एकूण १२ कोटी ७४ लाखांचा निधी मिळाला आहे. या वास्तूमध्ये मुलींच्या निवासाची सोय केली जाणार आहे. तर अहमदपूर व देवणी येथे वसतिगृहासाठी जागा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे आता भाड्याच्या जागेत वसतिगृह राहणार नाहीत. स्वत:च्या इमारतीत सामाजिक न्याय विभागाचे वसतिगृह असतील. केवळ तीन वसतिगृहांसाठी भाड्याने इमारत असेल, अशी माहिती समाजकल्याण सहाय्यक आयुक्त संजय दाणे यांनी दिली. शहरात मुलींना राहण्याची सोय नसल्यामुळे गळती होती. समाजकल्याणने वसतिगृहाची सोय केल्याने गळती थांबेल. (प्रतिनिधी)