महिलेच्या तावडीतून केली मुलीची सुटका

By Admin | Updated: July 17, 2016 00:34 IST2016-07-17T00:31:42+5:302016-07-17T00:34:07+5:30

औरंगाबाद : जादूटोणाविरोधी कायदा अमलात आला तरी करणी, भानामतीची भीती दाखवून गरीब आणि अशिक्षित, निराधारांना धमकावण्याचे प्रकार सर्रास सुरूच आहेत.

The girl has been released from the woman's custody | महिलेच्या तावडीतून केली मुलीची सुटका

महिलेच्या तावडीतून केली मुलीची सुटका

औरंगाबाद : जादूटोणाविरोधी कायदा अमलात आला तरी करणी, भानामतीची भीती दाखवून गरीब आणि अशिक्षित, निराधारांना धमकावण्याचे प्रकार सर्रास सुरूच आहेत. शहरापासून जवळच असलेल्या भांगसीमाता गडाजवळील करोडी येथे एका महिलेकडे राहणाऱ्या १६ वर्षीय मुलीस करणीची भीती दाखवून तिला शारीरिक यातना देण्यात आल्याचे समोर आले आहे. त्या मुलीवर होणारे अत्याचार न पाहावल्याने शेजाऱ्यांच्या सहकार्याने पोलिसांनी तिची सुटका झाली.
सुनीता जाधव (रा. करोडी) असे आरोपी महिलेचे नाव आहे. स्वाती (नाव बदलले आहे) या मुलीची आई (मूळ रा. बाळापूर, जि. अकोला) येथे राहते. स्वातीची आई आणि सुनीता या ओळखीच्या आहेत. आरोपी महिलेची मुले आणि सुना बजाजनगर येथे राहतात, तर ती एकटीच करोडी येथे राहते. ती जादूटोण्यातून आजार बरे करण्याचे लोकांना आश्वासन देत असते. सातवीपर्यंत शिकलेल्या स्वाती हिच्या अंगात भूत आहे, त्यामुळेच ती भांडण करीत असते, असे तिच्या आईला आरोपी महिलेने सांगितले होते. त्यावेळी तिचा आजार बरा करते असे सांगून ती मार्च महिन्यात स्वातीला आपल्या घरी घेऊन गेली होती. स्वातीकडून ती रोज घरकाम करून घेत असे. भूतबाधा काढण्याच्या नावाखाली तिला रोज झाडूने, काठीने मारहाण करीत असते. एवढेच नव्हे तर काही दिवसांपूर्वी ब्लेडनेही मारले होते. ब्लेडच्या जखमांमुळे तिच्या शरीरावर झालेले व्रण आजही पाहायला मिळतात. सुनीता ही महिला रोज स्वातीला त्रास देते. तिच्याकडून स्वातीला होणारा त्रास पाहावत नसल्याने शेवटी करोडी येथील नागरिकांनी थेट पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना फोन करून या घटनेची माहिती दिली.
आयुक्तांनी या घटनेची गंभीरतेने दखल घेऊन विशेष तपास पथकाच्या प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक अर्चना पाटील, दामिनी पथकाच्या महिला उपनिरीक्षक घुले, कर्मचारी सुधाकर मिसाळ, दीपक इंगळे, विजय नागरे, कैलास मळेकर, आशा कुंटे, प्राजक्ता वाघमारे यांनी करोडी येथे जाऊन जाधव यांच्या घरावर छापा मारून स्वातीची सुटका केली. हा छापा मारला त्यावेळी घरात जादूटोण्यासाठी वापरले जाणारे पूजेचे साहित्य आढळले. याप्रकरणी सुनीता जाधव या महिलेविरोधात दौलताबाद ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The girl has been released from the woman's custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.