मुलीला पित्याकडून ‘जीवघेणी शिक्षा’
By Admin | Updated: July 13, 2016 00:44 IST2016-07-13T00:26:38+5:302016-07-13T00:44:34+5:30
औरंगाबाद : उजळणी विसरण्याची एका चिमुकलीला तिच्याच पित्याकडून चक्क जीवघेणीच शिक्षा मिळाली. १२ चा पाढा म्हणताना ‘ती’ अडखळल्यामुळे संतापलेल्या पित्याने

मुलीला पित्याकडून ‘जीवघेणी शिक्षा’
औरंगाबाद : उजळणी विसरण्याची एका चिमुकलीला तिच्याच पित्याकडून चक्क जीवघेणीच शिक्षा मिळाली. १२ चा पाढा म्हणताना ‘ती’ अडखळल्यामुळे संतापलेल्या पित्याने चक्क बाजूला पडलेला कांदा उचलला आणि तिच्या तोंडात कोंबला. तो कांदा घशात अडकल्यामुळे श्वास गुदमरून या चिमुकलीचा अंत झाला. ही दुर्दैवी घटना बीड बायपास रोडवरील बाळापुरात घडली. भारती कुटे (६, रा. बाळापूर, औरंगाबाद तालुका) असे पित्यानेच बळी घेतलेल्या चिमुकलीचे नाव आहे. ती गावातच जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिलीत शिकत होती. तिचा पिता राजू कुटे (३०) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.
घटनेबाबत माहिती देताना चिकलठाणा ठाण्याचे निरीक्षक चतुर्भुज काकडे यांनी सांगितले की, आरोपी राजू हा पत्नी अनुसया, मुलगी भारती व एक तीनवर्षीय मुलगा, आई सरसाबाई आणि भाऊ सचिन यांच्यासोबत बाळापूर गावात राहतो. मोलमजुरी करून तो कुटुंबाची उपजीविका भागवीत होता. राजू हा आधीपासूनच तापट आणि रागीट स्वभावाचा होता. शनिवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास हे कुटुंब घरात बसलेले होते. राजूने मुलगी भारतीचा अभ्यास घेण्यास सुरुवात केली. त्याने तिला ‘चल उजळणी म्हण’ असे बजावले. भारतीने एक, दोन म्हणण्यास सुरुवात केली.
१२ वर तुटली जीवनाची दोर...
पाढे म्हणत म्हणत चिमुकली भारती १२ पर्यंत पोहोचली. पुढे तिला काही आठवेना. १२ नंतर पुन्हा ती १२ च म्हणाली. त्यावर राजूने किती, नीट सांग, तुला शाळेत हेच शिकवले का? असे बजावले; परंतु चिमुकलीला काही आठवेना. अनेकदा दरडावून विचारल्यानंतरही भारती पुढे नीट सांगेना. त्यामुळे राजू संतापला अन् त्याने बाजूला पडलेला मोठा कांदा उचलला व ‘तुला नीट पाढे म्हणता येत नाही’ असे म्हणत तो कांदा भारतीच्या तोंडात कोंबला. कांदा थोडा तोंडात गेल्यानंतर आणखी रागाने राजूने कांदा आत दाबला अन् तो कांदा थेट भारतीच्या घशात जाऊन अडकला. त्यामुळे श्वास गुदमरल्याने भारती तडफडू लागली. हे पाहून तिची आई अनुसया धावत आली. तिने आपल्या चिमुकलीच्या तोंडात अडकलेला कांदा काढण्याचा प्रयत्न केला; परंतु तो निघेना. काही क्षणातच भारतीची हालचाल मंदावली आणि ती बेशुद्ध पडली.
म्हणे खेळता खेळता कांदा गिळला...
पित्याने दिलेल्या या अघोरी शिक्षेनंतर भारती बेशुद्ध पडताच तिच्या आईने धावत जाऊन दिराला बोलावून आणले. मग घरच्यांनी तिला उचलले आणि गाडीत टाकून कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये आणले. तोपर्यंत भारतीचा श्वास गुदमरून मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी तेथे तिला तपासून मयत घोषित केले आणि शवविच्छेदनासाठी प्रेत घाटीत घेऊन जाण्याचे डॉक्टरांनी सांगितले. हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर खेळता खेळता भारतीने कांदा गिळला, असे तिच्या घरच्यांनी हॉस्पिटलमध्ये सांगितले.
शवविच्छेदन न करताच अंत्यसंस्कार
आता भारतीला घाटी रुग्णालयात नेले, तेथे शवविच्छेदन केले तर पोलिसांचा (पान २ वर)
आपल्या मुलीचा जीव घेतल्यानंतर आरोपी राजू कुटेने प्रेत स्मशानभूमीत पुरून टाकल्याची माहिती चिकलठाणा पोलिसांना सोमवारी रात्री समजली. त्यानंतर पुन्हा प्रेत काढून शवविच्छेदन करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला.
४त्यानुसार मंगळवारी सकाळी पोलीस निरीक्षक चतुर्भुज काकडे, नायब तहसीलदार एम. बी. वऱ्हाडे, मंडळ अधिकारी केशव टकले, तहसीलचे कर्मचारी डी. एम. पालेकर, तलाठी योगेश पंडित, सरपंच पद्मा वाघ, तंटामुक्ती समिती अध्यक्ष सुभाष पवार, मुख्याध्यापक बाळकृष्ण तुपे, शिक्षिका एस. डी. शेलार यांच्या उपस्थितीत बाळापूर स्मशानभूमीतून भारतीचे पुरलेले प्रेत दुपारी बाहेर काढण्यात आले.
आरोपी राजू कुटे याला आपली मुलगी भारती ही आधीपासूनच नकोशी होती, असे स्थानिक नागरिकांनी पोलिसांना सांगितले. यापूर्वीही त्याने एकदा भारतीला एकटीला विहिरीजवळ नेऊन सोडले होते. याशिवाय पत्नीसोबतही त्याचे सतत खटके उडत होते. त्याने अनेक महिने पत्नीला माहेरी नेऊन सोडलेले होते. या दाम्पत्यातील वाद पोलिसांपर्यंत यापूर्वीच गेलेला होता, असे गावकऱ्यांनी सांगितले.
पंचनामा करून नंतर घाटीत ते शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. शवविच्छेदनात भारतीच्या गळ्यात ‘तो’ कांदा आढळून आला. या काद्यामुळेच तिचा जीव गेल्याचे शवविच्छेदनात स्पष्ट झाल्याचे पोलीस निरीक्षक काकडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.