जिल्ह्यात मुली जन्माचा टक्का वाढला
By Admin | Updated: February 11, 2015 00:27 IST2015-02-11T00:22:50+5:302015-02-11T00:27:43+5:30
लातूर : कायद्याचा धाक आणि प्रबोधनाचा जागर जागविल्यामुळे लातूर जिल्ह्यात मुली जन्माचे स्वागत झाले. परिणामी, गेल्या दोन वर्षांत मुलींच्या जन्मदरात वाढ झाली असून

जिल्ह्यात मुली जन्माचा टक्का वाढला
लातूर : कायद्याचा धाक आणि प्रबोधनाचा जागर जागविल्यामुळे लातूर जिल्ह्यात मुली जन्माचे स्वागत झाले. परिणामी, गेल्या दोन वर्षांत मुलींच्या जन्मदरात वाढ झाली असून, हजारी ८५० असलेले प्रमाण आता ९९३ वर गेले आहे.
लातूर जिल्ह्यात १३० सोनोग्राफी सेंटर व १९० गर्भपात केंद्र आहेत. सोनोग्राफी सेंटर व गर्भपात केंद्रांवर सार्वजनिक आरोग्य विभागाने करडी नजर ठेवली. शिवाय, प्रबोधनाच्या जागरातही सातत्य ठेवले. त्यामुळे मुली जन्माचे प्रमाण वाढले आहे. गर्भपात केंद्रांची आणि सोनोग्राफी सेंटरची दर तीन महिन्याला तपासणी केली. गर्भलिंगनिदान चाचणी केली जाते का? अनाधिकृतपणे गर्भपात केला जातो का? या बाबींची जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीने नजर ठेवली. पीसीएनडीटी अॅक्टनुसार या सर्व केंद्रांची दर तीन महिन्याला तपासणी केली. सेंटर व केंद्र चालकांना कायद्याचा धाक दाखविल्यामुळे गेल्या दोन वर्षांत गर्भलिंगनिदान चाचणीचे व गर्भपाताचे एकही प्रकरण उजेडात आले नाही. परिणामी, मुली जन्माच्या प्रमाणात वाढ झाली. शिवाय, मुलगा आणि मुलगी समान असल्याचा जागरही आरोग्य विभागाच्या वतीने ग्रामीण भागात तसेच शहरी भागात केला. त्याचाही सकारात्मक परिणाम झाला असून, मुली जन्माचे प्रमाण वाढले आहे. २०११ मध्ये हजार मुलांमागे ८५० मुलींचे प्रमाण होते. २०१२ मध्ये ८५३, २०१३ मध्ये ९२३ आणि २०१४ मध्ये ९९३ मुलींचे प्रमाण झाले आहे.
एप्रिल २०१४ ते नोव्हेंबर २०१४ या ९ महिन्यांच्या कालावधीत हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण बऱ्यापैकी चांगले झाले आहे़ एप्रिल महिन्यात ९७५, मे-९७२, जून-९९५, जुलै-८८०, आॅगस्ट-९७९, सप्टेंबर-९८७, आॅक्टोबर -९७९, नोव्हेंबर-९८१, डिसेंबर-९९४ असे राहिले आहे़ २०१४ मध्ये सरासरी हजार मुलामागे ९९३ मुलींचे प्रमाण राहिले असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले़