छत्रपती संभाजीनगर : आईने आयुष्यभराच्या कमाईतून एक एक करत जवळपास १४ ते १५ तोळे सोन्याचे दागिने जमवले. विश्वासाने ते घरातच ठेवले. मात्र, अल्लड मैत्रीतून तिच्याच १९ वर्षीय मुलीने ते सर्व दागिने चोरले. मित्राने मागितले म्हणून देऊन टाकले. घडला प्रकार समोर आल्यानंतर धक्का बसलेल्या आईवर सदर टवाळखोर तरुणासह पोटच्या मुलीवरच चोरीचा गुन्हा दाखल करण्याची वेळ आली. मंगेश विलास पंडित (१९, रा. बेगमपुरा) असे त्याचे नाव असून बेगमपुरा पोलिसांनी त्याला अटक केली.
रक्षाबंधनाच्या दिवशीच धक्का५८ वर्षीय तक्रारदार महिला मुलगा व मुलीसह हडको परिसरात राहतात. आरोग्य विभागातून त्या नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. ९ ऑगस्ट रोजी सकाळी रक्षाबंधन असल्याने त्यांच्या मुलाने सोन्याची अंगठी मागितली. महिलेने कपाट उघडले असता डब्यात एकही दागिना आढळून आला नाही. शिवाय, १ लाख ५५ हजार रुपये रोख रक्कम देखील लंपास झाल्याचे आढळले. जवळपास १४.१ तोळ्यांचे दागिने व १ लाख ५५ हजार रुपये लंपास झाल्याने महिलेला धक्का बसला.
मुलगी गडबडलीमुलाने विश्वासाने आईला त्याबाबत माहीत नसल्याचे सांगितले. अकरावीत शिकणारी मुलगी मात्र उत्तर देताना गडबडली. आईने तिला विश्वासात घेतल्यावर तिने तिचा मित्र मंगेशला सर्व दागिने व पैसे दिल्याचे कबूल केले. मंगेशकडे दागिने नसल्याचे सांगितल्याने आईवर अखेर पोटच्याच मुलीविरोधात पोलिस ठाण्याची पायरी चढण्याची वेळ आली.
मित्राचा निर्लज्ज जबाब : म्हणतो पैसे खाण्या-पिण्यावर उडवलेतक्रार प्राप्त होताच पोलिस निरीक्षक मंगेश जगताप, उपनिरीक्षक सचिन देशमुख यांनी मंगेशला ताब्यात घेतले. पोलिसी पाहुणचार मिळताच मंगेशने मैत्रिणीला भावनिक गुंतवून दागिने, पैसे घेतल्याची कबुली दिली. मात्र, ते विकून खाण्या-पिण्यावर पैसे उडवल्याचे निर्लज्जपणे सांगितले. पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करत मंगेशला अटक केली. त्याने दागिने कुठे विकले, पैशांचे काय केले, याचा तपास सुरू असल्याचे निरीक्षक जगताप यांनी सांगितले.