घाणेवाडी-जालना जलवाहिनी लवकरच अंथरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:54 IST2017-07-19T00:52:45+5:302017-07-19T00:54:42+5:30
जालना : नवीन जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घाणेवाडी जलाशय ते जालना अशी जलवाहिनी अंथरण्यास मंजुरी मिळाली

घाणेवाडी-जालना जलवाहिनी लवकरच अंथरणार
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : नवीन जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घाणेवाडी जलाशय ते जालना अशी जलवाहिनी अंथरण्यास मंजुरी मिळाली असून, लवकरच ही जलवाहिनी अंथरण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी लोकमतशी बोलताना दिली.
जालना शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी निमाजकाळात १९३५ मध्ये घाणेवाडी जलाशयाची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर घाणेवाडी ते जालना ही जलवाहिनी बदलण्यात आली नाही. कालौघात ही जलवाहिनी जीर्ण झाल्याने जागोजागी गळती लागून पाण्याचा अपव्यय होत असल्याचे आढळून आले. तसेच या जलाशयाची संरक्षण भिंतही काही ठिकाणी कोसळली आहे. याबाबतचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच नगराध्यक्षा गोरंट्याल यांनी पाहणी केली. त्यानंतर जलवाहिनी अंथरण्याबाबत पालिकेचा काही दिवसांपासून पाठपुरावा सुरू असून, याला यश आल्याचे माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी सांगितले. तसेच विशेष बाब म्हणून जालना ते घाणेवाडी जलाशय अशी नवीन जलवाहिनी अंथरण्यासाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले. याचे कामही लवकरच सुरु होणार असून, संरक्षण भिंतीची डागडुजी करण्यासह परिसरातील वृक्षारोपण आणि इतर कामांसाठी निधी तरतूद करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही नगराध्यक्षा गोरंट्याल यांनी दिली. घाणेवाडी जलाशय हा जालना शहरासाठी वरदान ठरलेला आहे. याचे संवर्धन करण्यासह परिसराचे सुशोभीकरणासाठी पालिका प्रशासनाच्या मदतीने आवश्यक ती पाऊले उचलली जातील, असेही नगराध्यक्षा गोरंट्याल यांनी सांगितले.