चिंचोली येथे पाण्यासाठी घागरयुद्ध
By Admin | Updated: May 16, 2014 00:15 IST2014-05-15T23:43:09+5:302014-05-16T00:15:27+5:30
उमरगा : गेल्या दहा दिवसांपासून तालुक्यातील चिंचोली जहागीर येथे विद्युत पुरवठा खंडित झाल्याने गावाला पाणीपुरवठा करणार्या विंधन विहिरी बंद असल्याने गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली

चिंचोली येथे पाण्यासाठी घागरयुद्ध
उमरगा : गेल्या दहा दिवसांपासून तालुक्यातील चिंचोली जहागीर येथे विद्युत पुरवठा खंडित झाल्याने गावाला पाणीपुरवठा करणार्या विंधन विहिरी बंद असल्याने गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, घागरभर पाण्यासाठी ग्रामस्थांचे घागरयुद्ध गावात सुरू आहे. शहरापासून अवघ्या दहा किमी अंतरावर असलेल्या चिंचोली ज. या गावाची अडीच हजार लोकसंख्या आहे. या गावाच्या सार्वजनिक पाणीपुरवठ्यासाठी एका सामुदायिक विहिरीचा व एका विंधन विहिरीचा वापर सुरू आहे. उपलब्ध असलेल्या विंधन विहिरीच्या पाण्याची पातळी खालावल्याने विंधन विहिरीच्या पाणीसाठ्यात कमालीची घट होऊन विंधन विहीर उचक्या देत सुरू आहे. गेल्या एक महिन्यापासून या विंधन विहिरीच्या मोटारीत बिघाड झाल्याने विंधन विहीर बंद अवस्थेत आहे. गावात पाणीपुरवठा करण्यासाठी बांधण्यात आलेल्या सार्वजनिक विहिरीत जेमतेम पाणीसाठा उपलब्ध असला तरी या विहिरीपासून जलकुंभापर्यंत करण्यात आलेली पाईपलाईन कोंडल्यामुळे गेल्या एक वर्षापासून सदरची पाईपलाईन कुचकामी ठरली आहे. गावाला पाणीपुरवठा करण्ळात येत असलेली विहीर व विंधन विहिरीच्या विद्युत मोटारीला विद्युत कनेक्शन नसल्याने मोटारी बंद पडल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. (वार्ताहर) सरपंचाकडून पाणीपुरवठा गेल्या पंधरा दिवसांपासून या गावात निर्माण झालेल्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी येथील सरपंच विजयाताई पाटील, उपसरपंच शाम घोसले, पं. स. सदस्य भास्कर शिंदे, उल्हास पाटील यांच्या प्रयत्नातून गावाला टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा केला जात आहे. टँकरचा प्रस्ताव धूळ खात पडून या गावातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन ग्रामपंचायतीच्या वतीने २८ एप्रिल रोजी पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाकडे टँकर मागणीचा प्रस्ताव दाखल करण्यात आला असला तरी सदरच्या प्रस्तावास अद्याप शासकीय मंजुरी मिळाली नसल्याने टँकर मागणीचा प्रस्ताव शासन दरबारी धूळ खात पडून आहे.