शौचालयाचे अनुदान मिळेना; ग्रामपंचायतीला ठोकले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 01:03 IST2017-08-17T01:03:13+5:302017-08-17T01:03:13+5:30
वजनापूर येथील शौचालय अनुदानाचे पैसे मिळत नसल्याच्या कारणावरून लाभार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनी (दि.१५) ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकून १०० टक्के अनुदान मिळे पर्यंत कामकाज होऊ देणार नाही, अशी भूमिका लाभार्थ्यांनी घेतली

शौचालयाचे अनुदान मिळेना; ग्रामपंचायतीला ठोकले कुलूप
लोकमत न्यूज नेटवर्क
लासूर-स्टेशन : वजनापूर येथील शौचालय अनुदानाचे पैसे मिळत नसल्याच्या कारणावरून लाभार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनी (दि.१५) ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकून १०० टक्के अनुदान मिळे पर्यंत कामकाज होऊ देणार नाही, अशी भूमिका लाभार्थ्यांनी घेतली आहे. परिणामी सलग दुसºया दिवशी ग्रामपंचायत कार्यालय कुलूप बंद होेते.
शासनाने शंभर टक्के शौचालय बांधण्यासाठी चंग बांधला आहे. त्या करिता कर्मचाºयांना विहित वेळेची मर्यादा देऊन, ग्रामस्थांना प्रती शौचालय १२ हजार सानुग्रह अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे शौचालय बांधकाम करून घेण्यासाठी ग्रामस्थांनी उधार उसनवारी करून घेतले आहे.
येथील जवळपास २४१ शौचालय पूर्ण झाले असून १२७ शौचालयांचे प्रस्ताव अनेक दिवसांपासून पंचायत समिती कार्यालयात दाखल करण्यात आले आहे. दाखल असलेले प्रस्तावाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत शौचालय अनुदानाच्या लाभार्थ्यांनी पंधरा आॅगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला.
मंगळवारी (दि.१५) सकाळी ध्वजारोहण होताच लाभार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेत कार्यालयाला टाळे ठोकले व शंभर टक्के अनुदान मिळेपर्यंत ग्रामपंचायतीचे कामगाज होऊ देणार नाही अशी भूमिका
घेतली आहे.
या प्रकरणाची माहिती मिळताच गटविकास अधिकारी विद्याधर पाटील यांनी गावात जाऊन ग्रामस्थांशी चर्चा करून २५ टक्के लाभार्थ्यांना अनुदान देण्यात येईल, असे तोंडी आश्वासन दिले. त्यावर ग्रामस्थांचे समाधानी झाले नाही. गटविकास अधिकाºयांना रिकाम्या हाताने माघारी जावे लागले. त्यामुळे दोन दिवसांपासून येथील ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप कायम आहे.
या बाबत गटविकास अधिकारी पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, १०० टक्के लाभार्थ्यांना तात्काळ अनुदान देण्याची मागणी करण्यात आली आहे. परंतु पुरेसा निधी नसल्यामुळे काही काळ लाभार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.