एअर कार्गो सेवेसाठी इमारत सज्ज
By Admin | Updated: April 27, 2016 00:29 IST2016-04-26T23:55:24+5:302016-04-27T00:29:29+5:30
औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील जुन्या टर्मिनल इमारतीच्या जागी एअर कार्गोची सेवा सुरू केली जाणार आहे. यासाठी जुन्या टर्मिनल इमारतीचे कार्गो कॉम्प्लेक्समध्ये रुपांतर करण्यात आले आहे

एअर कार्गो सेवेसाठी इमारत सज्ज
औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील जुन्या टर्मिनल इमारतीच्या जागी एअर कार्गोची सेवा सुरू केली जाणार आहे. यासाठी जुन्या टर्मिनल इमारतीचे कार्गो कॉम्प्लेक्समध्ये रुपांतर करण्यात आले आहे. देशांतर्गत एअर कार्गो सेवेसाठी कॉम्प्लेक्सची इमारत सज्ज झाली असून, सुरक्षेच्या विविध अत्यावश्यक बाबींचे ब्युरो आॅफ सिव्हिल एव्हिएशन सेक्युरिटी (बीसीएएस) आॅडिट करीत आहे.
चिकलठाणा विमानतळावरून उद्योग, शेती व्यवसायातील माल आयात-निर्यात करण्यासाठी एअर कार्गो सेवा सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी विमानतळावरील जुन्या टर्मिनल इमारतीचे कार्गो कॉम्प्लेक्समध्ये बदल करण्यात आला आहे. देशांतर्गत एअर कार्गो सेवेसाठी दिल्ली येथील कार्गो सर्व्हिस सेंटरला कंत्राट मिळाले आहे. कॉम्प्लेक्सचे काम पूर्ण झाल्याने ‘बीसीएएस’कडून त्याचे आॅडिट केले जात आहे. त्यासाठी सोमवारी ‘बीसीएएस’चे पथक विमानतळावर दाखल झाले आहे. यामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक असणाऱ्या विविध बाबींची पडताळणी केली जात आहे. हे आॅडिट झाल्यानंतर देशांतर्गत एअर कार्गो सेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
आॅडिटवरच पुढील निर्णय
याठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेली यंत्रणा बसविण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा, स्फोटके शोधणारे विशेष यंत्र, मालाच्या तपासणीचे क्ष-किरण यंत्र इ. चा समावेश आहे. कार्गो कॉम्प्लेक्समधील सुरक्षेच्या दृष्टीने आॅडिटमध्ये काहीही त्रुटी न निघाल्यास विमानतळावरून देशांतर्गत एअर कार्गो सेवेचा लवकरच श्रीगणेशा होणार आहे.