वर्ष उलटूनही अनुदान मिळेना
By Admin | Updated: May 13, 2015 00:28 IST2015-05-13T00:08:25+5:302015-05-13T00:28:30+5:30
बीड: गतवर्षीही अवकाळीच्या फटक्याने जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले होत. प्रशासकिय स्तरावर नुकसानीची दखल घेत शेतकऱ्यांकरिता

वर्ष उलटूनही अनुदान मिळेना
बीड: गतवर्षीही अवकाळीच्या फटक्याने जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले होत. प्रशासकिय स्तरावर नुकसानीची दखल घेत शेतकऱ्यांकरिता अनुदानही जाहिर केले होते. मात्र प्रत्यक्षात अनुदान पदरी पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पराकष्ठा केल्या. तरीही जिल्ह्यातील तब्बल २ लाख २८ हजार ४८८ शेतकरी हे अनुदान पासून वंचितच राहिले आहेत.
खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, तूर या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. लागवडीपासून पाण्याची कमतरता तर काढणीच्या वेळी अवकाळी पावसाचा मारा या दुहेरी फटक्यामुळे खरीप हातचा गेला होता. प्रशासनाकडून शेतकऱ्यांविषयी सहानभुती दाखवत अनुदान देण्याचे घोषित केले. त्यानुसार ५० टक्के पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ४५०० रुपयांप्रमाणे रक्कम मिळणार होती. अनुदान जाहिर झाल्यापासून शेतकऱ्यांना एक ना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. अनुदानाच्या रकमेसाठी प्रथम शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बॅकांमध्ये खाते उघडण्याचे अनिवार्य करण्यात आले.
त्याकरिता शेतकऱ्यांना बॅकेच्या दारी खेटे मारावे लागत आहेत. बुडत्याला काडीचा आधार याप्रमाणे शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून शेतकऱ्यांना केवळ आश्वासनेच देण्यात येत आहे. पंधरा दिवसांपूर्वी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी आढावा बैठकीदरम्यान मे महिन्याच्या अखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने काम चालु असून आठ दिवसांच्या आत अनुदानाचे वाटप करण्यात येणार असल्याचे प्रशासकिय अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
एकीकडे उर्वरित शेतकऱ्यांच्या खरीप अनुदानासाठी प्रशासन कागदी घोडे नाचवत आहे तर दुसरीकडे मे महिन्याच्या मध्यावधीत बळीराजाला बियाणांसाठी पैशाची गरज आहे. गरजेपोटी शेतकरी बॅकांकडे हेलपाटे मारत आहे. आता खरिपाचे अनुदान मिळाले नाही तर खाजगी सावकाराचा सहारा शेतकऱ्यांना घ्यावा लागेल. म्हणजेच पहिले पाढे पंच्चावंन्न अशा कात्रीत जिल्ह्यातला शेतकरी सापडला आहे.