दूर होईना ‘नीट’ संभ्रम
By Admin | Updated: April 14, 2016 01:20 IST2016-04-14T00:38:01+5:302016-04-14T01:20:00+5:30
नजीर शेख , औरंगाबाद वैद्यकीय अभ्यासक्रमांतील प्रवेशासाठी मे २०१६ मध्ये ‘नीट’ (नॅशनल इलिजिबिलिटी एन्स्ट्रन्स टेस्ट- एनईईटी) परीक्षा होणार नाही, हे स्पष्ट करण्यात आले

दूर होईना ‘नीट’ संभ्रम
नजीर शेख , औरंगाबाद
वैद्यकीय अभ्यासक्रमांतील प्रवेशासाठी मे २०१६ मध्ये ‘नीट’ (नॅशनल इलिजिबिलिटी एन्स्ट्रन्स टेस्ट- एनईईटी) परीक्षा होणार नाही, हे स्पष्ट करण्यात आले असले तरी मे २०१७ मध्ये होणाऱ्या ‘नीट’ परीक्षेमुळेही राज्यातील विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला आहे. वैद्यकीय शिक्षणाचा गेल्या काही वर्षांपासून चालू असलेला खेळखंडोबा येत्या वर्षातही चालू राहणार असल्याचे दिसत आहे.
जुलै २०१३ साली ‘नीट’ रद्द झाल्यानंतर महाराष्ट्रात २०१४ आणि २०१५ या वर्षी ‘एमएचसीईटी’ घेण्यात आली. यामध्येही २०१५ सालची एमएचसीईटी ही केवळ बारावीच्या विज्ञान अभ्यासक्रमावर आधारित होती. आता मे २०१६ मध्ये ‘एमएचसीईटी’ होणार की ‘नीट’, असा संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला आहे. राज्याचे उच्च व वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ‘नीट’ परीक्षा राज्यात २०१७ मध्येच घेण्यात येईल, असे जाहीर केले आहे. मे २०१६ मध्ये परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असला तरी २०१७ मध्ये वैद्यकीय प्रवेशासाठी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपुढे नवाच पेच निर्माण झाला आहे.
२०१५ मध्ये वैद्यकीय प्रवेशासाठी एमएचसीईटी ही केवळ बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असल्याचे जाहीर केले गेले. त्यामुळे अनेक जणांना केवळ एमएचसीईटी द्यायची आहे, अशा विद्यार्थ्यांनी व कनिष्ठ महाविद्यालयांनीही अकरावीच्या अभ्यासक्रमाकडे दुर्लक्ष केले. आता २०१७ मध्ये परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची अकरावी संपून अनेक कनिष्ठ महाविद्यालयांत बारावीचा निम्मा अभ्यासक्रमही संपला आहे. या विद्यार्थ्यांनीही अकरावीच्या अभ्यासक्रमाकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. त्यामुळे आता २०१७ मध्ये ‘नीट’ द्यावयाची झाल्यास या विद्यार्थ्यांना आता पुन्हा अकरावीचा अभ्यास करावा लागेल. म्हणजे अभ्यासक्रमाचा हा उलटा प्रवास विद्यार्थ्यांना करावा लागणार आहे. यामुळे अनेक विद्यार्थी आणि पालकांमध्ये २०१७ मध्येही होऊ घातलेल्या ‘नीट’ला विरोध आहे.