जेनेरिक औषधांचा निर्णय बारगळला
By Admin | Updated: August 7, 2014 01:30 IST2014-08-07T00:46:41+5:302014-08-07T01:30:52+5:30
नांदेड : माफक दराने जेनेरिक औषधी देण्याचा निर्णय महानगरपालिकेने मागील वर्षी घेतला

जेनेरिक औषधांचा निर्णय बारगळला
नांदेड : गोरगरिबांना मोठ्या आजारासाठी माफक दराने जेनेरिक औषधी देण्याचा निर्णय महानगरपालिकेने मागील वर्षी घेतला होता़ मात्र अद्याप या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने हा प्रस्ताव बारगळला आहे़
शहराची लोकसंख्या साडेपाच लाख आहे़ यामध्ये गोरगरिबांची संख्या अधिक आहे़ मधुमेह, ऱ्हदयविकार, पक्षघात, मेंदूज्वर, कॅन्सर आदी मोठ्या आजारासाठी रूग्णांना औषधीसाठी लागणारा खर्च मोठ्या प्रमाणात करावा लागतो़ यासाठी संबंधित रूग्णांच्या कुटुंबाला कर्जबाजारी होण्याची वेळ येते़ गरीब रूग्णांना हा खर्च झेपत नाही़ त्यामुळे रूग्णांचे औषधीविना हाल होतात़ यावर उपाय करण्यासाठी मनपाच्या आरोग्य विभागाने गरजू रूग्णांना अत्यावश्यक जेनेरीक औषधे तत्पर व माफक दरात मिळावी यासाठी भव्य जेनेरीक औषधी दुकान स्थापन्याचा प्रस्ताव मांडला होता़ या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेत मंजुरीही मिळाली होती़ मात्र मनपाच्या दुर्लक्षामुळे अद्याप औषधी दुकान सुरू झाले नाही़
सदरील औषधी दुकानात इतर औषधी दुकानांपेक्षा अत्यंत कमी दराने औषधी उपलब्ध करून देण्याचे नियोजन होते़ त्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्याची अत्यंत महत्वाची फक्त जेनेरिक औषधी उपलब्ध ठेवण्यात येणार होती़ शिवाजीनगर येथील दवाखान्यात सर्व जेनेरिक औषधी उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले होते़ (प्रतिनिधी)