गायरान जमिनीसाठी उपोषण सुरूच
By Admin | Updated: May 19, 2015 00:46 IST2015-05-19T00:08:54+5:302015-05-19T00:46:28+5:30
जालना : अतिक्रमित शासकीय गायरान जमीन कास्तपट्टे दलित, आदिवासींच्या नावे करून सातबारा द्यावा, या मागणीसाठी शिवसेना दलित आघाडीच्या वतीने सुरू करण्यात आलेले

गायरान जमिनीसाठी उपोषण सुरूच
जालना : अतिक्रमित शासकीय गायरान जमीन कास्तपट्टे दलित, आदिवासींच्या नावे करून सातबारा द्यावा, या मागणीसाठी शिवसेना दलित आघाडीच्या वतीने सुरू करण्यात आलेले साखळी उपोषण सोमवारी सातव्या दिवशीही सुरू होते. प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून या उपोषणाकडे डोळेझाक झाल्याचा आरोप जिल्हाप्रमुख अॅड. भास्कर मगरे यांनी केला आहे.
अॅड. मगरे यांच्या नेतृत्वाखाली १२ मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले. या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून विविध प्रकारे आंदोलन करूनही मागणी मान्य झाली नसल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे.
यापूर्वी या उपोषणकर्त्यांनी आत्मदहनाचा इशाराही दिला होता. गायरान जमीन नियमनाकुल करण्यासाठी शासन निर्णयाप्रमाणे कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबत अॅड. मगरे म्हणाले की, जिल्हाधिकारी नायक यांनी १५ दिवसात याबाबतची प्रकरणे निकाली काढण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र एकाही अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली नाही, असेही अॅड. मगरे यांनी सांगितले.
या उपोषणात अॅड. मगरे यांच्यासह भाऊसाहेब तांबे, तुळशीदास पटेकर, मधुकर पाईकराव, प्रकाश रणपिसे, अण्णासाहेब बाळराज, तपन पडघने, दादाराव काकडे, अरूण वाघमारे यांच्यासह गायरान जमीनधारकांचा मोठा सहभाग आहे. (प्रतिनिधी)