शहर परिसरात गॅस्ट्रोचे थैमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2016 01:10 IST2016-07-10T00:56:04+5:302016-07-10T01:10:55+5:30

औरंगाबाद : शहर आणि लगतच्या भागांमध्ये गॅस्ट्रोच्या साथीने थैमान घातले असून, वाळूज परिसरातील मेहंदीपूर गावात गॅस्ट्रोमुळे एका ६ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Gastro's surroundings in the city area | शहर परिसरात गॅस्ट्रोचे थैमान

शहर परिसरात गॅस्ट्रोचे थैमान

औरंगाबाद : शहर आणि लगतच्या भागांमध्ये गॅस्ट्रोच्या साथीने थैमान घातले असून, वाळूज परिसरातील मेहंदीपूर गावात गॅस्ट्रोमुळे एका ६ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. घाटी रुग्णालयात सरासरी दररोज गॅस्ट्रोचे ५ ते ६ रुग्ण दाखल होत आहेत. तर खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्या यापेक्षा अधिक आहे; परंतु या आजाराला नियंत्रणात ठेवण्यात आरोग्य यंत्रणा अपयशी ठरत आहे. त्यामुळे शहर आणि परिसराचे आरोग्य धोक्यात आले आहे.
मेहंदीपूर गावात गॅस्ट्रोची लागण झाल्यामुळे काल एका ६ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. तर ८ बालकांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पावसाळ्याला सुरुवात होत नाही तोच शहरात जलजन्य विकारांनी डोके वर काढले. शहरातील विविध भागांमधील जलवाहिन्यांना ठिकठिकाणी गळती लागलेली आहे. त्यामुळे अशा ठिकाणाहून पिण्याच्या पाण्यामध्ये दूषित पाणी मिसळल्याने गॅस्ट्रोची लागण होत असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहर परिसरात गॅस्ट्रोचे रुग्ण वाढले आहेत. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेक जण गॅस्ट्रोने त्रस्त झाले आहेत. बालकांमध्ये गॅस्ट्रोचे प्रमाण काहीसे अधिक आहे.
दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोसह जलजन्य विकार उद्भवत आहेत. घाटी रुग्णालयासह खाजगी रुग्णालयांमध्ये अतिसार, उलट्या, पोटात मुरड येणे यासारख्या तक्रारी असलेले रुग्ण उपचारासाठी येत आहेत. बदललेल्या वातावरणामुळे गॅस्ट्रोच्या साथीचा जोर वाढला आहे. शहरातील विविध भागांमध्ये होणारा दूषित पाण्याचा पुरवठा आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात येत नसल्याने पसरलेली दुर्गंधी आजारांना आमंत्रण देत आहे; परंतु याकडे दुर्लक्ष होत आहे.
याविषयी महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.सुहास जगताप म्हणाले, गॅस्ट्रोचे रुग्ण आढळून येत आहेत; परंतु काळजी करण्यासारखी परिस्थिती नाही.
अन्नपदार्थ झाकून ठेवणे, शिळे अन्नपदार्थ खाणे टाळले पाहिजे. उलट्या, जुलाब असा त्रास झाल्यास वेळीच वैद्यकीय सल्ला घ्या, असा सल्ला डॉक्टरांनी दिला.

Web Title: Gastro's surroundings in the city area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.