बेलथर येथे पसरली गॅस्ट्रोची साथ
By Admin | Updated: September 13, 2014 23:04 IST2014-09-13T23:00:05+5:302014-09-13T23:04:19+5:30
आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील बेलथर येथे दूषित पाण्यामुळे गावात गॅस्ट्रोची साथ पसरली असून सहा रुग्णांना आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

बेलथर येथे पसरली गॅस्ट्रोची साथ
आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील बेलथर येथे दूषित पाण्यामुळे गावात गॅस्ट्रोची साथ पसरली असून सहा रुग्णांना आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून बाळापूर येथील आरोग्य पथकाने गावात जावून तपासणी मोहीम राबविली.
कळमनुरी तालुक्यातील बेलथर येथील पाणीपुरवठा करणाऱ्या नळासह हातपंपाना दूषित पाणी येत असल्याने हे पाणी प्याल्याने गावातील रंजना शिंदे, गजानन काकडे (वय ३५), संगीता काकडे (३०), मधुकर काकडे (४५), रंजना वाकळ यांना ग्रामीण रुग्णालयात गॅस्ट्रोची लागण झाल्याने दाखल करण्यात आले तर काशीनाथ काकडे (३२) यांना नांदेड येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. याची दखल घेत आखाडा बाळापूर येथील डॉ. मोहन अकोले, डॉ. शेट्टी, खोकले, पाईकराव, माखणे यांच्या पथकाने गावात जावून तपासणी मोहीम राबवली असून दीडशे घरातील ग्रामस्थांची तपासणी करून औषधोपचार केले.
यातील दहा ते बारा जणांना गॅस्ट्रोसदृश्य आजार असल्याचे तपासणीत आढळून आले. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे आरोग्य पथकाच्या सूत्रांनी सांगितले. (वार्ताहर)
गावात गॅस्ट्रोची लागण झाल्याची माहिती कळताच खडबडून जागे होणाऱ्या ग्रामसेवक घुगे यांना पाणी निर्जंतुकीकरणासाठी कालबाह्य झालेले टी.सी.एल औषध पुरवले. आरोग्य विभागाने वारंवार ग्रामपंचायतला कळवूनही याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे ग्रामस्थांना या साथीच्या आजाराला सामोरे जावे लागत आहे.
विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून शिक्षक फरार
आखाडा बाळापूर : गोटेवाडी येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची तपासणी करण्याकरीता आखाडा बाळापूर आरोग्य पथकाने शाळेकडे धाव घेतली. मात्र विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून सर्वच शिक्षकांनी शाळेला दांडी मारली. त्यामुळे आरोग्य पथकाला विद्यार्थ्यांची तपासणी करण्यासाठी सायंकाळपर्यंत ताटकळत थांबावे लागले.