जानेवारीपासून ९४० रूपयांना मिळणार गॅस
By Admin | Updated: November 28, 2014 01:12 IST2014-11-27T23:45:26+5:302014-11-28T01:12:50+5:30
बीड : घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरची थेट अनुदान योजना जानेवारी २०१५ पासून बीड जिल्ह्यात सुरू होत आहे़

जानेवारीपासून ९४० रूपयांना मिळणार गॅस
बीड : घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरची थेट अनुदान योजना जानेवारी २०१५ पासून बीड जिल्ह्यात सुरू होत आहे़ त्यासाठी डिसेंबर अखेर ग्राहकांना बँक खात्याशी संलग्नीकरण करून घेण्याची मुदत आहे़ जानेवारीपासून ९४० रूपयाप्रमाणे घरगुती गॅस सिलिंडर ग्राहकांना मिळणार आहे़
पेट्रोलियम गॅस मंत्रालयाने घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलिंडरसाठी ‘डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आॅफ एलपीजी सबसिडी’ ही ग्राहकांच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्याची योजना सुरू केली आहे़ प्रातिनिधीक स्वरूपातील महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात यापूर्वीच लागू झाली आहे़ जानेवारी २०१५ पासून महाराष्ट्रात सर्वत्र ही योजना सुरू होत आहे़ या योजनेंतर्गत घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर धारकांना ९४० रूपयांप्रमाणे गॅस सिलिंडर खरेदी करावा लागणार आहे़ त्याचे अनुदान ग्राहकांच्या बँक खात्यात जमा होणार आहे़
यापूर्वी ज्यांनी या योजनेत सहभाग घेतला व त्यांच्या बँक खात्यात गॅस सिलिंडरचे अनुदान जमा झाले अशांना काही करायची गरज नाही़ मात्र ज्यांनी सहभाग घेतला परंतु सबसिडी जमा झाली नाही त्यांनी नाव नोंदणीची स्थिती वितरकाकडून व पेट्रोलियम मंत्रालयाच्या टोल फ्री क्रमाकांवर किंवा संकेतस्थळावरून जाणून घेणे गरजेचे आहे, असे बीड येथील एचपी गॅस वितरक आनंद सारडा यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)४
ज्या ग्राहकांकडे आधार कार्ड आहे त्यांनी आधार क्रमांक खाते असलेल्या राष्ट्रीयीकृत बँकेला व गॅस वितरकांना द्यावयाचा आहे़ ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही त्यांनी बँक खात्याची माहिती एलपीजी गॅस वितरकाला देऊन त्यांच्याकडून एलपीजी आयडी संबंधित बँकेला देऊन खाते संलग्नीत करून घ्यावयाचे आहे़ डिसेंबर अखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे़