उद्यानातील साहित्य जलशुध्दीकरण केंद्रात

By Admin | Updated: July 12, 2015 00:44 IST2015-07-12T00:44:40+5:302015-07-12T00:44:40+5:30

कळंब : शहरातील पंडित जवाहरलाल नेहरू कार्यालयातून जवळपास महिनाभरापूर्वी गायब झालेले व्यायामाचे साहित्य पालिकेच्याच डिकसळ येथील

Gardening Equipment for Water Treatment Center | उद्यानातील साहित्य जलशुध्दीकरण केंद्रात

उद्यानातील साहित्य जलशुध्दीकरण केंद्रात


कळंब : शहरातील पंडित जवाहरलाल नेहरू कार्यालयातून जवळपास महिनाभरापूर्वी गायब झालेले व्यायामाचे साहित्य पालिकेच्याच डिकसळ येथील जलशुध्दीकरण केंद्रात ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता नगर परिषदेच्या वर्तुळातीलच कोणी या प्रकरणात गुंतलेले तर नाही ना? अशी चर्चा सुरु झाली आहे.
येथील पंडित जवाहरलाल नेहरू बालोद्यानात नगर परिषदेच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांच्या व्यायामासाठी साहित्य बसविण्यात आले होते. तसेच हे साहित्य बसविल्यानंतर त्याची निविदा मागविण्यात आली होती. त्यामुळे हा ‘टेंडर मॅनेज घोटाळा’ असल्याचे स्पष्ट झाले होते. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिध्द केल्यानंतर तहसील प्रशासनाने बालोद्यानाचा पंचनामा केला होता. यामध्ये व्यायामाच्या साहित्याची संख्या १७ असल्याचे म्हटले होते.
दरम्यान, नगर परिषदेने या साहित्य खरेदीची निविदाही मंजूर केली होती. यानंतर महिनाभरापूर्वी अचानक व्यायामाचे हे साहित्य बालोद्यानातून गायब झाले. त्यामुळे या टेंडर मॅनेज घोटाळ्यात समाविष्ट असलेल्यांनीच हे साहित्य गायब केल्याची चर्चा शहरात होती. साहित्य अचानक गायब झाल्याने नागरिकांमधूनही नाराजीचा सूर व्यक्त करण्यात येत होता. हे साहित्य नेमके गेले कुठे, याबाबत महिनाभरापासूनच चर्चा सुरू असतानाच शहराशेजारी डिकसळ येथील नगर परिषदेच्या जलशुध्दीकरण केंद्रात ते साहित्य असल्याचे प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर आढळून आले आहे. त्यामुळे आता या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे.
‘सीओं’ची भूमिका संशयास्पद
महिनाभरापूर्वी बालोद्यानातील साहित्य गायब झाल्यानंतर याबाबत न. प. चे मुख्याधिकारी सुंदर बोंदर यांच्याशी संपर्क साधला असता ज्या एजन्सीने हे साहित्य बसविले, त्यांनीच ते काढून घेतले असावे, अशी माहिती त्यांनी दिली होती. परंतु, हे साहित्य खुद्द नगर परिषदेच्या जलशुध्दीकरण केंद्रातच आढळून आल्याने याप्रकरणी सीओंची भूमिका संशयास्पद बनली आहे. विशेष म्हणजे, या जलशुध्दीकरण केंद्राच्या परिसरातील अग्निशमन विभागाच्या सदनिकेत सीओ कधी-कधी मुक्कामी राहत असल्याची माहिती हाती आली आहे. त्यामुळे संशयाचा गुंता आणखीन वाढत आहे. याप्रकरणाची सखोल चौैकशी करण्याची मागणी आता जोर धरत आहे.
बालोद्यानात सुरक्षारक्षक तसेच देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी हे साहित्य गायब झाल्यानंतर न. प. प्रशासनाला पत्र दिल्याची चर्चा होती. या पत्रामध्ये साहित्य कोणी काढले, त्यावेळी कोण-कोण उपस्थित होते, याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आल्याचेही सांगितले जात होते. परंतु, यामुळे न. प. मधील काही नेते व कर्मचारी अडचणीत येणार असल्याने हे पत्रच दाबल्याची चर्चा न. प. वर्तुळात होती.

Web Title: Gardening Equipment for Water Treatment Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.