मध्यरात्री गोलवाडीत टाकला कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 01:05 IST2018-03-05T01:05:08+5:302018-03-05T01:05:36+5:30

महापालिकेने पोलीस बळाचा वापर करून शनिवारी मध्यरात्री वाळूज परिसरातील गोलवाडी जकात नाक्यामागील मोकळ्या जागेवर कचरा आणून टाकला. तेथे तीसगावसह परिसरातील नागरिकांचा विरोध पोलिसांनी लाठीचार्ज करून मोडीत काढण्याचा प्रयत्न झाला. या सगळ्या प्रकारामुळे संतप्त नागरिक रविवारी सकाळी रस्त्यावर उतरले. वाळूजनजीक साऊथ सिटी चौकात मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला जाणाºया लोकप्रतिनिधींच्या गाड्या अडवून राग व्यक्त करीत गोलवाडी परिसरातच कचरा का टाकला याचा जाब विचारला.

Garbage thrown in the midnight at Golwadi | मध्यरात्री गोलवाडीत टाकला कचरा

मध्यरात्री गोलवाडीत टाकला कचरा

लोकमत न्यूज नेटवर्क
वाळूज महानगर : महापालिकेने पोलीस बळाचा वापर करून शनिवारी मध्यरात्री वाळूज परिसरातील गोलवाडी जकात नाक्यामागील मोकळ्या जागेवर कचरा आणून टाकला. तेथे तीसगावसह परिसरातील नागरिकांचा विरोध पोलिसांनी लाठीचार्ज करून मोडीत काढण्याचा प्रयत्न झाला. या सगळ्या प्रकारामुळे संतप्त नागरिक रविवारी सकाळी रस्त्यावर उतरले. वाळूजनजीक साऊथ सिटी चौकात मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला जाणाºया लोकप्रतिनिधींच्या गाड्या अडवून राग व्यक्त करीत गोलवाडी परिसरातच कचरा का टाकला याचा जाब विचारला.
तीसगाव, करोडी, साजापूर, गोलवाडी, वाळूज या भागातील नागरिकांचा कचरा डेपोला विरोध आहे. शनिवारी सकाळी कचरा टाकायला आलेल्या मनपाच्या वाहनांना नागरिकांनी विरोध केला होता. वाहने पुन्हा येण्याच्या शक्यतेने आंदोलकांनी गोलवाडी जकात नाक्यावर रात्री १२ वाजेपर्यंत पहारा दिला. १२ वाजेनंतर नागरिकांची संख्या कमी होताच मनपाने मध्यरात्री दोन वाजेदरम्यान जवळपास १५० ते २०० पोलिसांच्या बंदोबस्तात कच-याची वाहने गोलवाडीकडे आणली. कच-याची वाहने येताच तेथे असलेल्या २५ ते ३० महिला व पुरुषांनी कचरा टाकायला विरोध केला.
कचरा टाकण्यास विरोध करणा-या नागरिकांवर पोलिसांनी बळाचा वापर केला. कोणाला फोन लावू नये म्हणून त्यांच्याकडील मोबाईल व दुचाकीच्या चाव्या हिसकावून घेऊन लाठीचार्ज केला. पालिकेच्या १६ कच-याच्या गाड्या तेथील लष्क राच्या मोकळ्या जागेवर रिकाम्या केल्या गेल्या. पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये अनेकजण जखमी झाले असून, शिवाजी हिवाळे यांच्यासह अन्य दोघांचे मोबाईल फोडण्यात आल्याचा दावा आंदोलकांनी केला.
या घटनेचे पडसाद रविवारी उमटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाला जाणा-या लोकप्रतिनिधींची वाहने अडविण्याचा प्रयत्न नागरिकांनी केला.
साऊथ सिटी चौकात नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, स. पो. आयुक्त ज्ञानोबा मुंडे, पो. नि. ज्ञानेश्वर साबळे, पो. नि. पगारे, पो. नि. मुकुंद देशमुख, फौजदार आरती जाधव आदींनी घटनास्थळी धाव घेतली. तीसगावच्या सरपंच कौशल्याबाई कसुरे, माजी सरपंच अंजन साळवे, माजी जि. प. सदस्य रामचंद्र कसुरे, संजय जाधव, राजेश कसुरे, भूषण साळवे, फकीरचंद दाभाडे, राजू नेमाणे, शिवाजी हिवाळे, मोहन चौधरी, फकीरचंद भालेराव, विजय दिवेकर, केशव सलामपुरे, राम सलामबाद, राजू नेमाणे, देवी मुंगसे, राजू कणिसे, संतोष दळे, नागराज गायकवाड, प्रवीण नितनवरे, रमेश दाभाडे, किशोर साळवे, गौतम मोरे, गौतम बनसोडे, सुरेश फुलारे, गंगूबाई कसुरे, जया नेमाणे, कल्पना वाघमारे, मनीषा निकम, ज्योती सानप, लता बन, राधा सूर्यवंशी, संगीता गिरे, सीमा पवार, सीमा कसुरे आदींसह शेकडो जणांची उपस्थिती होती.
कचरा प्रक्रियेसाठी चार मशीन घेणार
औरंगाबाद : सतरा दिवस झाले तरी शहरातील कचराकोंडीचा प्रश्न सुटलेला नाही. कचºयावर प्रक्रिया करणा-या चार अत्याधुनिक मशीन युद्धपातळीवर खरेदी करण्यात येतील, अशी माहिती रविवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली. येणाºया दोन ते तीन दिवसांमध्ये कचराकोंडीही संपेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
कचºयावर प्रक्रिया करण्यासंदर्भात रविवारी एका खाजगी कंपनीने सादरीकरण केले. सादरीकरणानंतर महापौर म्हणाले की, या कंपनीचा अनुभव चांगला असून, देशातही कचरा व्यवस्थापनात चांगले काम असल्याने कचºयावर प्रक्रिया करण्यासाठीचा हा चांगला पर्याय ठरू शकतो. आर्थिकदृष्ट्या महापालिकेला या तंत्रज्ञानाने कच-यावर प्रक्रिया परवडणारी आहे. कारण वर्गीकरण झाल्याने निम्मा कचरा कमी होणार आहे. याशिवाय वाहतुकीचा, इंधनाचा व कामगारांवर होणारा खर्च कमी होणार आहे. सद्य:स्थितीत तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे. यासाठी बायो मेकॅनिकल कंपोस्ंिटगच्या चार मशीन खरेदी करण्यात येणार आहेत.
मिटमिट्यात समितीला पिटाळले
औरंगाबाद : विभागीय आयुक्तांनी कचºयासाठी नेमलेल्या समितीने रविवारी शहराच्या परिसरातील विविध जागांची पाहणी केली. मिटमिटा येथे समितीच्या गाड्या नागरिकांनी रोखून धरल्या. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. नागरिकांचा रौद्र अवतार पाहून समितीने काढता पाय घेतला. यावेळी नागरिकांना हुसकावून लावण्यासाठी पोलिसांनी रिव्हॉल्व्हर काढल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
रविवारी सकाळी ९ वाजता महसूल विभागाचे अधिकारी, महापालिकेचे अधिकारी मिटमिटा येथील सफारी पार्क परिसरात जागा पाहण्यासाठी गेले होते. यामध्ये अप्पर तहसीलदार रमेश मुंडलोड, उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल, मनपाचे सहायक आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, घनकचरा प्रकल्पप्रमुख डी. पी. कुलकर्णी यांचा समावेश होता.
कचरा टाकण्यासाठी सफारी पार्कच्या जागेची पाहणी करण्यासाठी अधिकारी आल्याचे समजताच नागरिक जमा झाले. मिटमिटा कचरा डेपोविरोधी कृती समितीचे पदाधिकारी, नागरिकांनी जोरदार विरोध करून प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. यावेळी अधिका-यांसोबत आलेल्या सुरक्षारक्षकाने बंदूक काढली, असा आरोप नागरिकांनी केला. नागरिकांच्या रोषानंतर अधिकारी परतले.
गांधेली, कांचनवाडीतील नागरिकांना धमक्या
औरंगाबाद : पश्चिम मतदारसंघातील कांचनवाडी, नक्षत्रवाडी, गोलवाडी, छावणी परिषद, मिटमिटा, तीसगाव परिसरात कचरा टाकण्यास विरोध झाल्यानंतर पालिकेने गांधेलीतील खदानींच्या रिक्त जागांचा शोध घेतला असून, तेथे कचरा टाकण्याची तयारी सुरू केली आहे. याची माहिती मिळताच ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांची तातडीची बैठक झाली, बैठकीत परिसरात कचरा टाकण्यास विरोध करण्यात आला. दरम्यान, गांधेलीतील नागरिकांना मनपा प्रशासनाकडून पोलीस कारवाईच्या धमक्या देण्यात आल्यामुळे मनपाच्या विरोधात ग्रामस्थांनी दोन हात करण्याची भूमिका घेत एकतेची वज्रमूठ आवळली आहे, तर शिवसेनेचे आ.संजय शिरसाट यांनी पश्चिम मतदारसंघात कुठेही कचरा डेपोसाठी जागा देणार नसल्याचा निर्धार करीत जनआंदोलन उभे करण्याचा इशारा रविवारी दिला. त्यांनी कांचनवाडी, नक्षत्रवाडी, गोलवाडी, छावणी परिषद, मिटमिटा, तीसगाव, गांधेली परिसरात नागरिकांच्या भेटी घेत आंदोलनाचा इशारा दिला.
नेत्यांची पाठ
लासूर येथे मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला जात असताना विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे वाहन साऊथ सिटी चौकात अडविण्याचा नागरिकांनी प्रयत्न केला, पण बागडे यांचे वाहन न थांबविताच पुढे निघून गेले. नागरिक बागडे यांच्या वाहनामागे पळत होते. खा. चंद्रकांत खैरे यांची गाडी अडवून कचºयाच्या प्रश्नासंदर्भात भूमिका जाणून घ्यायची होती.
खा. खैरे मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला याच मार्गाने जातील म्हणून नागरिक साऊथ सिटी चौकात दोन ते अडीच तास त्यांची प्रतीक्षा करीत थांबले होते. मात्र दुस-या मार्गाने खैरे लासूरला गेले. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला जाणारे आ. अतुल सावे, उपमहापौर विजय औताडे यांची वाहने अडवून त्यांना कचरा गोलवाडीत का टाकला याचा जाब नागरिकांनी विचारला.

Web Title: Garbage thrown in the midnight at Golwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.