गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुदान यादीत गैरव्यवहार
By Admin | Updated: September 12, 2014 00:08 IST2014-09-11T23:38:35+5:302014-09-12T00:08:32+5:30
सोनपेठ : फेरफार करून काही अनुदान शेतकऱ्यांना वाढवून दिल्याची तक्रार आहे़

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुदान यादीत गैरव्यवहार
सोनपेठ : तालुक्यातील आवलगाव येथील शेतकऱ्यांच्या यादीत फेरफार करून काही शेतकऱ्यांचे अनुदान वगळून काही शेतकऱ्यांना वाढवून दिल्याची तक्रार येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून दिली आहे़
येथील तहसील कार्यालयाने गारपिटीने नुकसान झाल्याची अनुदान निश्चित केल्याची यादी ९ एप्रिल रोजी जाहीर केली़ यात आवलगाव शिवारातील ६४७ शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला़ त्यात ३७ लाख ५५ हजार २५० रुपये तरतूद करण्यात आली़ परंतु, त्यानंतर तहसील कार्यालयात या यादीतील शेतकऱ्यांचे अनुदान कमी करून यादीतील काही शेतकऱ्यांना अनुदान जास्त देण्यात आले़
विशेष म्हणजे यादीतील ३६ लाख ५५ हजार २५० रुपये ही तरतूद कायम ठेवून काही शेतकऱ्यांची रक्कम कमी करून ३० शेतकऱ्यांना रक्कम वाढवून देण्यात आली़ यादीतील रक्कमेत कमी जास्त करताना काय निष्कर्ष लावण्यात आले, याची चौकशी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना तहसीलदारांनी रक्कम वाढवून दिलेल्या शेतकऱ्यांचे समर्थन करताना त्यांच्या द्राक्षाच्या बागा असतील, असे उत्तर देऊन शेतकऱ्यांना उद्धट वर्तवणूक दिल्याचे शेतकरी माधव अनंतराव जयतपाळ यांनी लोकमतशी बोलताना दिली़
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांना ही कैफियत सांगितल्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांना त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत़ (वार्ताहर)