घाटीत कच-याचा डोंगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 01:20 IST2017-10-15T01:20:50+5:302017-10-15T01:20:50+5:30
घाटीत मूत्रपिंड विकार व मूत्रपिंडरोपण विभागाच्या परिसरात कच-याचे ढीग साचले आहेत.

घाटीत कच-याचा डोंगर
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महापालिकेच्या दुर्लक्षामुळे घाटी रुग्णालयात कचरा डेपो तयार झाला आहे. घाटी प्रशासनाने वारंवार विनंती करूनही चार दिवसांपासून कचरा उचलण्यासाठी महापालिकेचा ट्रक घाटीत फिरकला नाही. त्यामुळे मूत्रपिंड विकार व मूत्रपिंडरोपण विभागाच्या परिसरात कच-याचे ढीग साचले आहेत.
नारेगाव येथील कचरा डेपो हटविण्याच्या मागणीसाठी १३ गावांतील नागरिकांनी एकत्र येऊन शुक्रवारपासून आंदोलन उभारले. त्यामुळे महापालिकेची कचरा कोंडी झाली आहे.
घाटी रुग्णालयात कच-याचा प्रश्न तीव्र झाला आहे. १० आॅक्टोबरपासून येथील कचरा उचलण्यात आलेला नाही. गेली काही महिने उघड्यावर पडून राहणा-या कच-याच्या समस्येवर नियंत्रण आलेले असताना पुन्हा एकदा मूत्रपिंड विकार व मूत्रपिंडरोपण विभागाच्या बाजूला कच-याचा ढीग पडून आहे. काळ्या, निळ्या पिशव्यांबरोबर लाल पिशव्यांमध्ये संकलित केलेला कचरा याठिकाणी पडून आहे. त्यामुळे रुग्णांचे आरोग्य धोक्यात येत आहे. घाटीतील विविध विभाग, वॉर्डात निर्माण होणारा कचरा मूत्रपिंड विकार व मूत्रपिंडरोपण विभागाच्या आवारात साठविण्यात येतो. हा कचरा महापालिकेच्या वाहनांद्वारे उचलण्यात येतो; परंतु सध्या कचरा उचलणे ठप्प आहे. त्यामुळे कच-यामुळे रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना प्रचंड दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.
दोन पत्र दिले
घाटीत १० आॅक्टोबरपासून महापालिकेची गाडी कचरा उचलण्यासाठी आलेली नाही. त्यासंदर्भात दोन पत्र पाठविले. शिवाय मी स्वत: दोन-तीन वेळा महापालिकेत फोन केल्याचे घाटीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे यांनी सांगितले.