जालना शहरात खड्ड्यांमध्ये रोपटे नव्हे कचरा
By Admin | Updated: September 17, 2015 00:25 IST2015-09-17T00:01:48+5:302015-09-17T00:25:52+5:30
जालना : नगर पालिकेने लाखो रुपये खर्च करुन शहर वृक्षमय करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नगर पालिकेने शहरात विविध विभागात २ हजारपेक्षा जास्त खड्डे खादले आहेत.

जालना शहरात खड्ड्यांमध्ये रोपटे नव्हे कचरा
जालना : नगर पालिकेने लाखो रुपये खर्च करुन शहर वृक्षमय करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नगर पालिकेने शहरात विविध विभागात २ हजारपेक्षा जास्त खड्डे खादले आहेत. लोकमतने बुधवारी या वृक्षलागवडीचे स्टिंग आॅपरेशन केले असता बहुतांश ठिकाणी खड्डे बुजले असून, अनेक खड्ड्यांमध्ये कचरा साचल्याचे उघड झाले.
शहरात वृक्ष लागवड वाढावी. पर्यावरण संतुलित राहावे या हेतूने नगर पालिकेने विशेष योजनेतून वृक्ष लागवडीसाठी दीड ते दोन फुटांचे कंत्राटदारामार्फत खड्डे तयार केले. विविध ठिकाणी खड्डे तयार केले असले तरी पालिकेच्या दुर्लक्षामुळे खड्डे जैसे थेच झाले. काही दिवस उलटले तरी या खड्ड्यांमध्ये वृक्ष लागवड पालिकेने केली नाही. वृक्ष लावगड केली असती तर पडलेल्या पावसामुळे या झाडांना फायदा झाला असता. वाढही बऱ्यापैकी झाली असते. पालिकेचे शहर वृक्षमय करण्याचे स्वप्न कागदावरच आहे. वृक्ष लागवडीसाठी मुहूर्त कधी लागणार याची प्रतीक्षा नागरिकांनाही आहे. रस्त्याच्या कडेला तीन ते चार फुट अंतरावर हे खड्डे तयार करण्यात आले आहेत.
नगर पालिका नागरिकांकडून वृक्ष कर आकारते. मात्र स्वत: तयार केलेल्या खड्ड्यांमध्ये झाडे लावण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. याविषयी पालिकेचे मुख्याधिकारी दीपक पुजारी म्हणाले, ज्या खड्डे बुजले असतील ते पुन्हा तयार करुन त्यात वृक्ष लागवड करण्यात येईल. यासाठी पालिकेने नियोजन केले आहे. पावसाअभावी वृक्ष लावगड करण्यात आली नाही. (प्रतिनिधी)