गणोरे वावरला ‘फिल्मी स्टाईल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:49 IST2017-09-12T00:49:40+5:302017-09-12T00:49:40+5:30
बँक अधिकारी जितेंद्र होळकर यांच्या हत्येत महत्त्वाची भूमिका निभावणारा शिवसेना शाखाप्रमुख किरण गणोरे हा घटनेच्या दुसºया दिवशी अगदी फिल्मी स्टाईल वावरल्याचे समोर आले आहे.

गणोरे वावरला ‘फिल्मी स्टाईल’
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : बँक अधिकारी जितेंद्र होळकर यांच्या हत्येत महत्त्वाची भूमिका निभावणारा शिवसेना शाखाप्रमुख किरण गणोरे हा घटनेच्या दुसºया दिवशी अगदी फिल्मी स्टाईल वावरल्याचे समोर आले आहे. चित्रपटामध्ये एखादा व्हिलन खून करूनही आपला त्या घटनेशी संबंध नसल्याचे दाखविण्यासाठी ज्या गोष्टी करतो अगदी तशाच गोष्टी गणोरेने केल्याचे समोर आले आहे. जणू या घटनेशी आपला काहीच संबंध नाही, याप्रमाणे तो होळकर यांच्या छत्रपतीनगरातील घरी तसेच त्यांचे शवविच्छेदन सुरू असतानाही घाटीत गेला होता.
बँक अधिकारी जितेंद्र होळकर यांची हत्या त्यांच्या पत्नी भाग्यश्री होळकर हिनेच सुपारी देऊन घडवून आणल्याचे रविवारी समोर आले. शुक्रवारी रात्री होळकर यांचा गळा चिरून खून करण्यात आला होता. भाग्यश्री हिने हत्येसाठी सुपारी दिलेल्या रकमेतील अॅडव्हान्स म्हणून दहा हजार रुपये किरणला मिळाले होते. किरणने यातील एक हजार रुपये तौसिफला दिले आणि नऊ हजार स्वत:कडे ठेवून घेतले होते. काम झाल्यानंतर उर्वरित रक्कम किरणमार्फत भाग्यश्री आरोपींना देणार होती. होळकर यांच्या हत्येच्या कटात महत्त्वाची भूमिका बजावणारा किरण याप्रकरणी आपण पकडले जाऊ नये, याची काळजी घेत होता. या खबरदारीचा भाग म्हणून व आपल्यावर संशय येऊ नये म्हणून घटनेच्या रात्री तो स्वत:च्या घरीच झोेपून होता. सामाजिक कार्यकर्त्याप्रमाणे तो घटनेच्या दुसºया दिवशी होळकर यांचे शवविच्छेदन सुरू असताना घाटीत गेला. घाटीतील अभ्यागत समितीचा सदस्य या नात्याने तो तेथील काही लोकांशी बोललाही. दिवसभर फिरल्यानंतर शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे तो घरी झोपला.