गंगाखेडचे नगरसेवक सहलीवर
By Admin | Updated: May 29, 2014 00:21 IST2014-05-29T00:16:54+5:302014-05-29T00:21:09+5:30
गंगाखेड: आगामी जून महिन्यापासून अडीच वर्षांसाठी गंगाखेडचे नगराध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी सुटले आहे.

गंगाखेडचे नगरसेवक सहलीवर
गंगाखेड: आगामी जून महिन्यापासून अडीच वर्षांसाठी गंगाखेडचे नगराध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी सुटले आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नगराध्यक्षपदासाठी घडामोडीला वेग आला असून राजकारण तापू लागले आहे. त्यातूनच दोन्ही गटांचे २३ नगरसेवक सहलीवर गेले आहेत. येथील नगराध्यक्षपद डिसेंबर २०११ ते जून २०१४ या अडीच वर्षाच्या कालावधीसाठी खुल्या प्रवर्गाला सुटले होते. सहा प्रभागातून राष्ट्रवादीचे १०, भाजपाचे ५, शिवसेना २, काँग्रेस ४, अपक्ष १ आणि घनदाट मित्रमंडळ १ असे २३ नगरसेवक निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला बाजूला ठेवून भाजप-शिवसेना- काँग्रेस व घनदाट मित्रमंडळाच्या नगरसेवकाने गंगाखेड पॅर्टन राबवून नगराध्यक्षपद आपल्याकडे खेचून आणले. यावेळी खुल्या प्रवर्गातून डिसेंबर २०११ ते मार्च २०१३ या सव्वा वर्षासाठी अलका बाळकाका चौधरी या नगराध्यक्षा झाल्या. मार्च २०१३ ते जून २०१४ साठी खुल्या प्रवार्गातून सव्वा वर्षाच्या कालावधीसाठी नगराध्यक्ष म्हणून रामप्रभू मुंडे यांची निवड झाली. जून महिन्याच्या तिसर्या आठवड्यापासून येथील नगराध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी अडीच वर्षांच्या काळासाठी राखीव आहे. आगामी काळात होणार्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता, नगरपालिकेवर आपली सत्ता असावी आणि आपल्याच पक्षाचा नगराध्यक्ष व्हावा, असे वाटत असल्याने नगरसेवकांना सहलीला जावे लागले आहे. राष्ट्रवादीचे १०, काँग्रेसचे ४ व अपक्ष १ असे १५ नगरसेवक डॉ. मधुसूदन केंद्रे यांच्यासोबत गेल्याचे बोलले जात आहे. तर भाजपा ५, शिवसेना २, मित्रमंडळ १ व राकाँचे दोन-तीन नगरसेवक रामप्रभू मुंडे यांच्यासोबत सहलीला गेल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे गंगाखेडच्या राजकारणात बर्याच घडामोडी होण्याचे चिन्हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस सोबत काँग्रेस आघाडीचा धर्म पाळण्यासाठी वरिष्ठ पातळीवरुन प्रयत्न केले जात आहेत. हे प्रयत्न यशस्वी झाल्यास गंगाखेड पॅटर्नला खो बसणार आहे. (प्रतिनिधी)
गंगाखेड नगरपालिकेतील उर्मिला मधुसूदन केंद्रे, संजीवनी श्रीधरराव मुरकुटे (राष्ट्रवादी काँग्रेसच्या), अॅड. सुप्रिया श्रीराम मुंडे (अपक्ष), जयश्री रामप्रभू मुंडे (भाजप), वर्षा गोविंद यादव (काँग्रेस) या पाच महिलांपैकी नगराध्यक्ष कोण होणार, हे आगामी काळातच स्पष्ट होईल.