छत्रपती संभाजीनगर : मुकुंदवाडीत अवैध व्यावसायिक व गुन्हेगारांची हप्तेखोरी, खंडणीवरून उडालेल्या टोळीयुद्धात पसार तीन कुख्यात गुन्हेगारांना मुंबईतून अटक करण्यात आली. सोमवारी पोलिसांचा ससेमिरा मागे लागल्याचे कळताच तिघांनी मुंबईकडे धूम ठोकली होती. बुधवारी रात्री ठाणे रेल्वेस्थानकावरून त्यांच्या मुसक्या आवळून शहरात आणण्यात आले.
विक्की ऊर्फ हेल्मेट गौतम सोनकांबळे (३३), मुकेश ऊर्फ मुक्या महेंद्र साळवे (२७), बालाजी साहेबराव पिवळ (३२, सर्व रा. मुकुंदवाडी) अशी अटकेतील आरोपींचे नावे आहेत. यापूर्वी त्यांचे साथीदार किशोर शिंदे व उमेश गवळीला अटक करण्यात आली होती. रविवारी गुन्हेगारांच्या टोळीने सुनील डुकले यांच्यावर सशस्त्र हल्ला करून २ हजार रुपयांची खंडणी मागितली. शिवाय, १० हजार रुपये हिसकावून पोबारा केला. यावेळी दगडफेक, हवेत गोळीबार केल्याने तणाव निर्माण झाला. त्यांच्याकडील शस्त्रसाठ्याबाबत पोलिसांनी मात्र सोयीस्कररीत्या चुप्पी साधली. त्यांच्या अटकेनंतर मुकुंदवाडी, राजनगर, पुंडलिकनगर येथील व्यावसायिक, रहिवाशांनी समाधान व्यक्त केले.
...तरीही मंगळवारी स्टेटस ठेवलेसोमवारी सर्व गुन्हेगार पसार झाले. गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप गुरमे, उपनिरीक्षक प्रवीण वाघ हे सातत्याने त्यांच्या मागावर होते. बुधवारी ते मुंबईत असल्याचे कळताच उपनिरीक्षक वाघ, अंमलदार विजय निकम, मनोहर गिते, विजय भानुसे, कृष्णा गायके, सोमनाथ डुकले, राजाराम डाखुरे यांचे पथक रवाना झाले. दिवसभर धारावी, दादर, अंधेरीत शोध घेतला. सायंकाळी ठाण्याच्या रेल्वेस्थानकावरून त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. न्यायालयाने त्यांना २९ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. विशेष म्हणजे, पोलिस मागावर असल्याचे माहिती असतानाही गुन्हेगारांनी व्हॉट्सॲप, सोशल मीडियावर मंगळवारी पोलिसांना आव्हान देणारे स्टेटस ठेवले होते.
तिघांचे मिळून १०८ गुन्हेविकी, मुकेश व बालाजी या तीन गुन्हेगारांवर एकूण गंभीर स्वरूपाचे १०८ गुन्हे दाखल आहेत. त्यात विकी व बालाजीवर प्रत्येकी ४६, तर मुकेशवर १६ गुन्हे दाखल आहेत. तरीही मुकुंदवाडी पोलिस ठाण्यापासून काही अंतरावर ते राजरोसपणे गुंडगिरी, हप्ते, खंडणी वसुलीसाठी फिरत होते. त्यामुळे मुकुंदवाडीतील काही ठरावीक अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
आणखी चार आरोपी निष्पन्नरविवारच्या तणावात विकी हेल्मेटचे आणखी चार साथीदार निष्पन्न झाले. रोहित म्हस्के, अजय ऊर्फ आज्या आदमाने, सुंदरू सुदऱ्या कांबळे, संकेत लांबदांडे अशी त्यांची नावे असून ते पसार झाले आहेत. विशेष म्हणजे, पोलिसांनी देखील न्यायालयात यांची टोळी असून टोळीने गुन्हेगारी करत असल्याचे मान्य केले.