वाहनचोरांची टोळी पोलिसांच्या जाळ्यात
By Admin | Updated: August 13, 2014 01:41 IST2014-08-13T01:14:40+5:302014-08-13T01:41:40+5:30
औरंगाबाद : शहर व परिसरातून दुचाकी चोरी करून त्या ग्रामीण भागात नेऊन विक्री करणाऱ्या एका टोळीला गुन्हे शाखा पोलिसांनी सोमवारी रात्री वाळूज परिसरात अटक केली

वाहनचोरांची टोळी पोलिसांच्या जाळ्यात
औरंगाबाद : शहर व परिसरातून दुचाकी चोरी करून त्या ग्रामीण भागात नेऊन विक्री करणाऱ्या एका टोळीला गुन्हे शाखा पोलिसांनी सोमवारी रात्री वाळूज परिसरात अटक केली. या टोळीतील अटक केलेल्या चारही आरोपींच्या ताब्यातून चोरीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या.
आरोपींमध्ये कलीम खान ऊर्फ अजमेरा सत्तार खान (३०, रा. त्रिवेणीनगर, कटकटगेट), सचिन अशोक वाहूळ (रा. समतानगर), सचिन सूर्यकांत बिजोरो (रा. रांजणगाव), रवी सुधाकर पवार (रा. कुऱ्हाडी, ता. जिंतूर, परभणी) यांचा समावेश आहे. त्यांचा एक साथीदार संतोष लक्ष्मण साळुंके (रा. रांजणगाव) हा पोलिसांना चकमा देऊन पळून जाण्यात यशस्वी ठरला. आरोपी कलीम खान याच्या विरुद्ध चोऱ्या, दरोडा, घरफोड्यांचे अनेक गुन्हे दाखल आहेत, तर सचिन वाहूळविरुद्धही चोरीचे काही गुन्हे दाखल आहेत.
कारवाईबाबत पोलिसांनी सांगितले की, वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दावत हॉटेलवर वरील चार आरोपी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली.
माहिती मिळताच रात्री पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सुभाष खंडागळे, जमादार मच्छिंद्र ससाणे, रावसाहेब जोंधळे, सय्यद रफियोद्दीन, देवीदास इंदुरे, अशोक नागरगोजे, सुरेश कुसाळे, प्रभाकर राऊत, भानुदास पवार, शेख जावेद व त्यांच्या सहकाऱ्यांनी दावत हॉटेल गाठले. तेथे वरील चारही आरोपी काही तरी गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने तयारीनिशी बसलेले पोलिसांना सापडले. पाचवा आरोपी पोलिसांना पाहून पळून गेला.
पकडलेल्या आरोपींकडे चार दुचाकी होत्या. ‘खाक्या’ दाखवून विचारपूस करताच या चारही मोटारसायकली आपण शहरातून चोरी केलेल्या आहेत, अशी या आरोपींनी कबुली दिली. सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून त्यांच्याकडून वाहनचोरीचे आणखी अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.