गणेशाला सहस्त्रमोदकांचा नैवेद्य
By Admin | Updated: September 12, 2014 23:51 IST2014-09-12T23:49:49+5:302014-09-12T23:51:07+5:30
सार्वजनिक गणेशोत्सव : सावंतवाडीतील वैश्यवाडा उत्सव मंडळाचा उपक्रम

गणेशाला सहस्त्रमोदकांचा नैवेद्य
सावंतवाडी : शहरातील उभाबाजार व वैश्यवाडा येथे मोठ्या उत्साही वातावरणात सुरू असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवात संकष्टी चतुर्थीनिमित्त शुक्रवारी मोदक ‘श्रीं’ च्या चरणी अर्पण करण्यात आले. तत्पूर्वी पहाटे बहुसंख्य भाविकांच्या उपस्थितीत वैश्यवाडा येथे सामुदायिक अथर्वशीर्ष पठण करण्यात आले.
उभाबाजार व वैश्यवाडा येथील श्री हनुमान मंदिर येथे २१ दिवसांचा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू आहे. वेद पाठशाळेचे प्राचार्य दीक्षित गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली सूर्योदयाआधी सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम झाला. यावेळी बहुसंख्य भाविक उपस्थित होते. यावेळी वैश्यवाडा येथे साईनाथ मिशाळ तर उभाबाजार येथे संजय मसूरकर यांना पूजेचा मान मिळाला. दुपारी १ वाजता महाआरती होऊन श्रींना सहस्त्र मोदकांचा नैवेद्य अर्पण करण्यात आले. यावेळी श्रींना मोदकांचा नैवेद्य देण्यासाठी खूप गर्दी झाली होती. यावेळी माजी आमदार दीपक केसरकर, माजी आमदार राजन तेली, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष काका कुडाळकर आदी उपस्थित होते.
या गणेशोत्सवात रोज भजनादी कार्यक्रम सुरू आहेत. धोंडी दळवी, महादेव गावडे, अॅड. परिमल नाईक, शरद सुकी, विश्वनाथ नार्वेकर, म्हापसेकर बंधू, भाजी मार्केट मित्रमंडळ, शरद नार्वेकर यांच्यातर्फे भजनाचे कार्यक्रम होत आहेत. गणेश विसर्जनादिवशी डॉ. दादा केसरकर यांच्याकडून पंचखाद्य प्रसाद व श्रींना लघुरुद्र आनंद नेवगी यांच्याकडून केला जाणार आहे. तर उभाबाजार येथे बाल गोपाळ मित्रमंडळाचे अध्यक्ष रघुनाथ कोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली बाळू कासार, अरूण भिसे, बंड्या कोरगावकर, प्रशांत वाळके, प्रतिक कोरगावकर, कुंदन टोपले, नित्यानंद कोरगावकर, प्रणव शिरोडकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)