वाहन तपासावे की, विसर्जन करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 23:57 IST2017-09-03T23:57:58+5:302017-09-03T23:57:58+5:30
वाहन तपासावे की, विसर्जन करावे, असा प्रश्न गणेश मंडळांसमोर उभा राहिला आहे.

वाहन तपासावे की, विसर्जन करावे
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : गणेश विसर्जन मिरवणुकीत नेण्यात येणारी वाहने तांत्रिक दृष्ट्या सक्षम असावीत, अशी सूचना आरटीओ कार्यालयाने केली आहे. त्यासाठी वाहनांची तपासणी करून घेणे बंधनकारक केले आहे; परंतु ग्रामीण भागातील वाहनांची गणेश विसर्जनाच्या दिवशीच ५ सप्टेंबरला ही तपासणी होणार आहे, त्यामुळे वाहन तपासावे की, विसर्जन करावे, असा प्रश्न गणेश मंडळांसमोर उभा राहिला आहे.
जिल्ह्यात अडीच ते तीन हजार गणेश मंडळे आहेत. ५ सप्टेंबरला मोठ्या उत्साहात गणरायाला निरोप दिला जाणार आहे. विसर्जनानिमित्त शहराबरोबर ग्रामीण भागात मिरवणुका काढण्यात येतात. यामध्ये सहभागी होणारी वाहने नादुरुस्त, तांत्रिकदृष्ट्या सक्षम असावीत, यासाठी वाहनांची तपासणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी आरटीओ कार्यालयाने मोटार वाहन निरीक्षकांची नेमणूक केली आहे. गंगापूर, वैजापूर, पैठण, कन्नड, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, खुलताबाद येथील पोलीस ठाण्यांत मंगळवारी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत ही तपासणी केली जाणार आहे. तपासणीनंतर वाहनचालकांना वाहन सक्षम असल्याचे पत्र दिले जाईल; परंतु गणेश विसर्जनाच्या दिवशीच तपासणी करण्याची वेळ येत आहे, त्यामुळे वाहन तपासणी कधी करायची आणि कधी विसर्जन करायचे, असा प्रश्न गणेश मंडळांकडून विचारला जात आहे.
आरटीओ कार्यालयात १ ते ५ सप्टेंबरदरम्यान या तपासणीची सुविधा देण्यात आली. त्यात आता शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत; परंतु ग्रामीण भागातून केवळ या तपासणीसाठी येणे परवडणारे नाही, त्यामुळे अनेकांनी या तपासणीकडे दुर्लक्ष केले आहे. ग्रामीण भागातही या कालावधीत तपासणी होणे आवश्यक होते; परंतु ग्रामीण भागात शेवटच्या दिवशी तपासणी होणार असल्याने वाहनांची गर्दी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.