गायरान अतिक्रमणधारकांचे आंदोलन
By Admin | Updated: December 23, 2015 23:46 IST2015-12-23T23:20:00+5:302015-12-23T23:46:18+5:30
उस्मानाबाद : वाशी तालुक्यातील गोजवाडा येथील भूमिहिन गायरान अतिक्रमण धारकांनी २२ डिसेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत

गायरान अतिक्रमणधारकांचे आंदोलन
उस्मानाबाद : वाशी तालुक्यातील गोजवाडा येथील भूमिहिन गायरान अतिक्रमण धारकांनी २२ डिसेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत निवासी सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे. प्रशासनाकडून ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे बुधवारीही हे आंदोलन सुरू होते.
गोजवाडा येथील भूमिहिन गायरान कुटुंबांनी १९७६ पासून गायरान जमिनी वहितीखाली आणल्या आहेत. या जमिनीत विविध पिके घेऊन कुटुंबाची उपजिविका भागवितात. मात्र मागील दोन वर्षापासून गावातीलच काही मंडळीकडून उभ्या पिकामध्ये जनावरे सोडून पिकांची नासधूस केली जात आहे. पेरणीवेळी अडथळे आणले जातात. अशा लोकांविरुद्ध पोलिसात तक्रार देऊनही ठोस कारवाई होत नाही, असे आंदोलकांचे म्हणणे आहे. वनविभागाचे कर्मचारीही संबंधित गायरानधारकांना त्रास देत असून, केसेसही दाखल करीत आहेत. या केसेस मागे घेण्यात याव्यात, १९७६ पासून कसत असलेल्या जमिनीचा फेर महाराष्ट्र शासन-वनविभाग असा झाला आहे. तो तात्काळ रद्द करावा व ही जमीन अतिक्रमणधारकांच्या नावे करावी, गावातील गावगुंडांचा बंदोबस्त करून प्रतिबंधात्मक कारवाई करावी, चालू वर्षात वहित केलेल्या गायरान जमिनीचा तात्काळ पंचनामा करावा, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. २२ डिसेंबर रोजी सुरू झालेले आंदोलन दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारीही चालू होते. या आंदोलनात महाराष्ट्र लोकाधिकार मंचचे राज्य सदस्य विनायक पवार, विश्वनाथ तोडकर, नागरी हक्क अभियानचे राजकुमार तोगरे, संदिपान गायकवाड, जमीन अधिकार आंदोलनचे अध्यक्ष आश्रुबा गायकवाड, जिल्हा संघटक सुनील कांबळे, गायरानधारक अशोक तोडकर, हणमंत आरण, लिंबा लोंढे, नाना लोंढे, काका आरण आदी सहभागी झाले आहेत. (वार्ताहर)