‘पंचायत राज’ च्या पद्भारानंतर पहिला दौरा गडचिरोलीचा : संभाजी पाटील निलंगेकर
By Admin | Updated: May 21, 2015 00:29 IST2015-05-21T00:19:14+5:302015-05-21T00:29:41+5:30
दत्ता थोरे ,लातूर पंचायत व्यवस्था ही तळातील लोकांची व्यवस्था आहे. लोकशाहीच्या संकल्पनेने यश वरच्याला काय मिळते याच्यावर नाही तर खाली काय झिरपते याच्यावर अवलंबून आहे

‘पंचायत राज’ च्या पद्भारानंतर पहिला दौरा गडचिरोलीचा : संभाजी पाटील निलंगेकर
दत्ता थोरे ,लातूर
पंचायत व्यवस्था ही तळातील लोकांची व्यवस्था आहे. लोकशाहीच्या संकल्पनेने यश वरच्याला काय मिळते याच्यावर नाही तर खाली काय झिरपते याच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे ग्रामविकास ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून प्रशासकीय यंत्रणांना सरकारी योजना गावात नेण्यासाठी डोळ्यात तेल घालून प्रयत्न करेन. निवडीचा आनंद साजरा करणार नाही तर पदभार घेतल्यावर पहिला दौरा गडचिरोलीचा करुन तेथील गावांच्या विकासाला प्राधान्य देईन, अशा शब्दात आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी आपल्या निवडीचे स्वागत करताना ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
पंचायत राज समितीचे अध्यक्षपद घोषित झाल्यानंतर ते खास ‘लोकमत’ला मुलाखत देताना बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, पक्षाने मला या पदासाठी योग्य समजून जबाबदारी दिली, हे मी माझे भाग्य समजतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या विश्वासाने माझ्यावर चांगले काम करुन घेण्यासाठी ‘पंचायत’ सोपविली असे मी मानतो. कारण माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी सांगितले होते की, सरकार जेव्हा शंभर रुपये देते तेव्हा तळात दहा रुपये जातात. आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारने शंभर दिले तर शंभरच्या शंभर तळात जाऊ द्या, ही मोहीम हाती घेतली आहे. हा तळ म्हणजे गावची पंचायत आहे. विकासाचा केंद्रबिंदू गाव झाले पाहीजे, असे मानणारा मी कार्यकर्ता आहे. निलंगा सारख्या ग्रामीण भागातून राजकीय काम सुरू केल्याने गावच्या समस्या काय असतात ? हे मला ज्ञात आहे. युवा मोर्चाचा अध्यक्ष, पक्षाचा सरचिटणीस म्हणून काम करताना राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचे दौरे मी केले आहेत.
स्वातंत्र्याच्या एवढ्या वर्षानंतरही रस्त्याविना गावे, शाळांविना गावे, लाईटविना गावे, पाण्याविना गावे ही पाहिले की अस्वस्थ व्हायचो. आता ही मिळालेली संधी ती माझी अस्वस्थता दूर करण्यासाठी वापरेन. शेकडो योजना आहेत. निट अंमलबजावणी होत नाही. पारदर्शकतेचा अभाव आहे. योजना ज्यांच्यासाठी आहेत त्यांनाच योजनांची माहिती नाही. अशा प्रशासनातही चांगले अधिकारी आहेत पण त्यांनाही काही मर्यादा पडताहेत.
यांच्यातला मला दुवा व्हायला निश्चितपणे आवडेल. म्हणून ही मी माझ्यासाठी उत्तम संधी मानतो. माझ्या सरकारने दिलेला तळासाठीचा निधी तळापर्यंत प्रशासन नेते की नाही, यावर पंचायत राज समितीचा अध्यक्ष म्हणून माझा डोळ्यात तेल घालून ‘वॉच’ असेल.
मी जोपर्यंत पंचायत राज समितीच्या अध्यक्ष पदावर आहे, तोपर्यंत माझ्यासाठी गडचिरोली जिल्हा विशेष असेल. तळापर्यंत विकास न्यायचा तर मी कोरडाठाक् असलेला तळ प्रयोग म्हणून प्राधान्याने निवडेन तो म्हणजे गडचिरोलीचा. पायाभूत सुविधांपासून कोसो दूर असलेल्या या जिल्ह्यातील गावात शासकीय योजना घेऊन जाण्यासाठी मी जिवाचे रान करेन. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागाला अधिक प्राधान्य दिले जाईल, असेही आमदार संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले.
आ. संभाजीराव पाटील म्हणाले की, माझी निवड ही लातूरकरांसाठी आनंदाची बाब आहे. माझ्या रुपाने लातूरला हा मान पहिल्यांदाच मिळाला आहे. मराठवाड्यातूनही यापूर्वी एकदा चंद्रकांत दानवे यांची निवड झाली होती. त्यानंतर मराठवाड्यालासुद्धा हा मान पहिल्यांदाच आहे. त्यामुळे मायभूमी म्हणून मराठवाड्यावर माझे विशेष लक्ष असेल, असेही ते म्हणाले.