भावी डॉक्टर संभ्रमात
By Admin | Updated: April 30, 2016 00:06 IST2016-04-29T23:45:41+5:302016-04-30T00:06:33+5:30
औरंगाबाद : वैद्यकीय प्रवेशासाठी द्यावयाच्या ‘सीईटी’ ऐवजी ‘नीट’ (नॅशनल इलिजिबिलीटी कम एंट्रन्स टेस्ट) द्यावी लागणार असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी डॉक्टर होण्याच्या आशाच सोडून दिल्या

भावी डॉक्टर संभ्रमात
औरंगाबाद : वैद्यकीय प्रवेशासाठी द्यावयाच्या ‘सीईटी’ ऐवजी ‘नीट’ (नॅशनल इलिजिबिलीटी कम एंट्रन्स टेस्ट) द्यावी लागणार असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी डॉक्टर होण्याच्या आशाच सोडून दिल्याचे चित्र शुक्रवारी शहरातील कनिष्ठ महाविद्यालय आणि खाजगी क्लासेसमध्ये दिसले. तर दुसरीकडे सीबीएसईची पार्श्वभूमी असलेले विद्यार्थी मात्र, फारसे चिंतेत दिसत नाहीत.
सर्वोच्च न्यायालयाने १ मे रोजी ‘नीट’घेण्याचे आदेश दिल्यानंतर विशेष करून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी केवळ ‘सीईटी’चा अभ्यास केला आहे व ज्यांना राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाची पार्श्वभूमी आहे, अशा विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण आहे. शुक्रवारी शहरातील काही कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये आणि खाजगी क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांच्या तोंडी ‘नीट’ हा एकच विषय होता. ‘आता डॉक्टर होण्याची आशा सोडून द्यावी लागेल’ अशा प्रतिक्रिया विद्यार्थी व्यक्त करताना दिसले.
१ मे रोजी होणारी ‘नीट’ द्यावी, ५ तारखेची राज्य सरकारची ‘सीईटी’ द्यावी की २४ जुलै रोजी पुन्हा होणारी ‘नीट’ द्यावी, यासंदर्भात विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम आहे. डीएफसीचे संचालक गोविंद काबरा यासंदर्भात म्हणाले की, विद्यार्थ्यांनी १ मे ची ‘नीट’देऊच नये. ज्यांनी केवळ अनुभव यावा म्हणून ‘एआयपीएमटी’चा अर्ज भरला आहे. त्या विद्यार्थ्यांनीदेखील अभ्यास नसल्याकारणाने ‘नीट’ देऊ नये. कारण त्यांना पुन्हा २४ जुलै रोजी चान्स मिळणार नाही. त्याऐवजी नव्याने अर्ज दाखल करून आणि तीन महिन्यांत चांगला अभ्यास करून २४ जुलै रोजीची ‘नीट’देणे उत्तम राहील. राज्य सरकारही यासंदर्भात ‘पुनर्विलोकन याचिका’ दाखल करत आहे, ही चांगली बाब आहे.