उजाड झालेल्या देवगिरी कारखान्याचे भविष्य अधांतरी
By Admin | Updated: May 12, 2015 00:54 IST2015-05-12T00:35:34+5:302015-05-12T00:54:57+5:30
फुलंब्री : येथील देवगिरी सहकारी साखर कारखाना गेल्या पाच वर्षांपासून बंद असल्याने उजाड झाला आहे. त्यामुळे आता कारखान्याचे भविष्य अधांतरी झाले आहे.

उजाड झालेल्या देवगिरी कारखान्याचे भविष्य अधांतरी
फुलंब्री : येथील देवगिरी सहकारी साखर कारखाना गेल्या पाच वर्षांपासून बंद असल्याने उजाड झाला आहे. त्यामुळे आता कारखान्याचे भविष्य अधांतरी झाले आहे. कारखाना बंद झाल्यामुळे सुमारे साडेसातशे कर्मचारी बेघर झाले आहेत. अनेकांना पोटासाठी स्थलांतर करावे लागले आहे. शेतकऱ्यांच्या उसालाही कोणी वाली राहिलेला नाही.
फुलंब्री येथील देवगिरी साखर कारखाना १९९३ साली अस्तित्वात आला. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष म्हणून डॉ. नामदेवराव गाडेकर होते. ९४-९५ साली कारखान्याने पहिले गाळप केले. या काळात कारखाना परिसरात उसाचे क्षेत्र भक्कम होते. त्यामुळे कारखाना पाच वर्षे व्यवस्थित चालला; पण त्यानंतर कारखान्याला ग्रहण लागले. अचानक दुसऱ्याच्या हाती कारखाना गेला. पुढे प्रशासक नेमला गेला. यामुळे कारखान्याची अधोगती झाली. वीस वर्षांच्या कार्यकाळात कारखाना केवळ आठ वर्षे व्यवस्थित चालला. मध्यंतरी क्षमतेपेक्षा कमी गाळप झाल्याने कारखाना आर्थिकदृष्ट्या तोट्यात आला. या काळात मशिनरीवर गंज चढला, साहित्याची चोरी झाली. आता कारखाना परिसर उजाड झाला आहे.
कारखाना सुरू करण्याची ओरड नाही
देवगिरी साखर कारखान्याचे फुलंब्री व औरंगाबाद तालुक्यात कार्यक्षेत्र आहे. कारखाना बंद झाल्यामुळे येथील ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आले. मात्र, त्यांनी कारखाना सुरू करण्यासाठी कधीही आवाज उठविला नाही. याचा परिणाम होऊन उसाचे क्षेत्र घटले; पण कारखाना काही सुरू झाला नाही. आता केवळ एक लाख टन ऊस आहे. कर्मचाऱ्यांनी पगार मिळावा म्हणून अनेक वेळा आंदोलने केली.