धुऱ्याच्या वाद बेतला बाप-लेकाच्या जीवावर
By Admin | Updated: March 4, 2016 23:33 IST2016-03-04T23:30:05+5:302016-03-04T23:33:39+5:30
चारठाणा: दोन शेतकऱ्यांच्या धुऱ्याचा वाद विकोपाला गेला आणि त्यातून १ मार्च रोजी घडलेल्या दुहेरी खुनाच्या घटनेने जिंतूर तालुका हादरला आहे.

धुऱ्याच्या वाद बेतला बाप-लेकाच्या जीवावर
चारठाणा: दोन शेतकऱ्यांच्या धुऱ्याचा वाद विकोपाला गेला आणि त्यातून १ मार्च रोजी घडलेल्या दुहेरी खुनाच्या घटनेने जिंतूर तालुका हादरला आहे.
जिंतूर तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील रामभाऊ सोनाजी वाव्हळे व बाजीराव मल्हारी वाव्हळे यांच्यात धुऱ्याचा वाद होता. दोघांच्या शेतातून विजेचे खांब जाणार होते. परंतु, बाजीराव मल्हारी वाव्हळे हे विजेचे खांब शेतातून नेण्यास नकार देत होते. यातूनच हा वाद चिघळला. तसेच २० फेब्रुवारी रोजी रामभाऊ सोनाजी वाव्हळे यास मयत बाजीराव वाव्हळे यांनी मारहाण केली होती. त्यावरुन चारठाणा पोलिस ठाण्यात बाजीराव वाव्हळे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला होता. या प्रकारानंतर दोन्ही गटांत वैमनस्य निर्माण झाले. या दोन्ही गटांवर चारठाणा पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली होती.
१ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास बाजीराव मल्हारी वाव्हळे व त्यांचा मुलगा मिलिंद वाव्हळे हे दुचाकीवरुन येत असताना बाबासाहेब वाव्हळे, त्यांचा मेहुणा राहुल सुखदेव शिंदे व इतरांनी त्यांना अडविले.
बाजीराव वाव्हळे यांचे हातपाय बांधून त्यांच्यावर कोयत्याने वार केले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा मिलिंद वाव्हळे हा गंभीर जखमी झाला. मिलिंद वाव्हळे यास नांदेड येथे उपचारासाठी नेण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान २ मार्च रोजी मिलिंद वाव्हळे याचा मृत्यू झाला. त्यामुळे धुऱ्याचा वाद बाप-लेकांच्या जीवावरच बेतला आहे. (वार्ताहर)