खाद्यतेलाच्या भावात आणखी घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:19 IST2021-02-05T04:19:25+5:302021-02-05T04:19:25+5:30
औरंगाबाद : मागील आठवड्यात सरकी, सोयाबीन व पामतेलाच्या भावात लिटरमागे २ ते १० रुपयांपर्यंत घट झाली. मात्र, भाजीमंडईत ...

खाद्यतेलाच्या भावात आणखी घट
औरंगाबाद : मागील आठवड्यात सरकी, सोयाबीन व पामतेलाच्या भावात लिटरमागे २ ते १० रुपयांपर्यंत घट झाली. मात्र, भाजीमंडईत जुन्या लसणाचे भाव किलो मागे ५० रुपयांनी वधारले. उन्हाळ्याची चाहूल लागताच हैदराबादहून नवीन कैरी बाजरात दाखल झाली.
खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडले असताना मागील दोन आठवड्यांपासून हलक्या प्रतीच्या खाद्य तेलात मंदी आल्याने ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला. सध्या सरकी व सोयाबीन तेलाची सर्वांत जास्त विक्री आहे. मागील आठवड्यात सरकी तेलात १० रुपये कमी होऊन ११० ते ११४ रुपये प्रति लिटर विकत आहे. ४ ते ५ रुपयांनी सोयाबीन तेलात भाव कमी होऊन ११६ ते १२० रुपये तर पामतेल २ ते ४ रुपयांनी उतरून १०८ ते ११० रुपयांनी प्रति लिटर विकत आहे. याचा परिणाम सूर्यफूल तेलावर मात्र झाला नाही. ते १३५ रुपये व शेंगदाणा तेल १५५ ते १६० रुपये प्रति लिटर विकत आहे. नवीन करडी बीची आवक फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू होईल, यामुळे करडीतेलाचे भाव १८० रुपये स्थिर होते.
मागील आठवड्यात भाजीमंडईत हैदराबादहून नवीन गावरान कैरी व तोतापरी कैरीची आवक सुरू झाली. १२० ते १५० रुपये प्रतिकिलोने ग्राहक कैरी खरेदी करत आहेत. जुन्या हायब्रीड लसणाचे भाव ५० रुपयांनी वाढून १५० ते २०० रुपये किलोने विक्री झाला. नवीन गावरान लसूण बाजारात येण्यास आणखी महिना लागणार आहे. यामुळे गावरान लसूण २५० ते ३०० रुपये किलोनेच अजून विकला जात आहे.
चौकट
स्थानिक बटाट्याची आवक जास्त
फुलंब्री भागातून बटाट्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र, तळल्यानंतर वेफर्स लाल पडतात. यामुळे हे बटाटे भाजी, वडसाठी जास्त वापरले जात आहेत.
सागर पुंड
भाजी विक्रेता
---
कांद्याचे भाव वाढले
निर्यात बंदी केल्याने कांदा शेतकऱ्यांना १० रुपये किलोने विकावा लागला होता; पण आता निर्यातबंदी उठल्याने कांदा बाजारात ३५ ते ४० रुपयांपर्यंत विकत आहे. शेतकऱ्यांना १५ रुपये मिळत आहेत.
-सोपान खिल्लारे
शेतकरी
---
खाद्य तेलातील भाववाढ रोखा
महिन्याला आमच्या कुटुंबाला १५ लिटर तेल लागते. खाद्य तेलाचे भाव वाढल्याने बजेट बिघडले आहे. खाद्यतेलाच्या किमती ७० रुपयांपर्यंत खाली आणाव्यात.
-संगीता चिंने
गृहिणी
-------
चौकट
भाजी १७ जानेवारी २४ जानेवारी
शेवग्याच्या शेंगा १२० ते १५० रु. ७५ ते ८० रु.
लसूण १०० ते १२० रु. १५० ते २०० रु.
(हायब्रीड)
कांदा २५ ते ३० रु. ३५ ते ४० रु.
गवार ४० ते ५० रु. ७५ ते ८० रु.
----
खाद्यतेल १७ जानेवारी २४ जानेवारी
सरकी तेल १२० ते १२२ रु. ११० ते ११४ रु.
सोयाबीन तेल १२० ते १२५ ११६ ते १२०
पामतेल ११० ते ११४ १०८ ते ११०
सूर्यफूल तेल १३४ ते १३५ १३४ ते १३५