कसाब यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
By Admin | Updated: May 7, 2014 00:29 IST2014-05-07T00:29:34+5:302014-05-07T00:29:54+5:30
बदनापूर : नानेगाव येथील सरपंच मनोज कसाब यांच्या पार्थिवावर गावात सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

कसाब यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
बदनापूर : नानेगाव येथील सरपंच मनोज कसाब यांच्या पार्थिवावर गावात सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सोमवारी मनोज कसाब यांच्या निधनाची वार्ता कळताच गावात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली. पोलिस प्रशासनाने लगेचच या गावात मोठा बंदोबस्त वाढविला. संतप्त नातेवाईकांनी कसाब यांचा मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात नेल्यानंतर खळबळ उडाली. सर्व आरोपींना अटक करावी, त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली. यावेळी पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांनी सर्व आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला असून अटकही करण्यात आली असल्याची माहिती दिल्यानंतर कसाब यांचा पार्थिव गावी आणण्यात आला. सायंकाळी ५ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंंह, माजी मंत्री गंगाधर गाडे, रिपाइंचे नेते अॅड. ब्रह्मानंद चव्हाण, मातंग मुक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक साबळे, भारिप बहुजन महासंघाचे सुधाकर निकाळजे, सुधाकर रत्नपारखे, मुकुंद सोनवणे, एन. डी. गायकवाड, बदनापूरचे सरपंच राजन मगरे, केळीगव्हाणचे राहुल तुपे आदी उपस्थित होते. कसाब यांच्या कुटुंबियांना २५ लाख रूपये आर्थिक मदत द्यावी, त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे व हा खून खटला चालविण्याकरीता अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी यावेळी उपस्थितांनी केली.सन २०१० मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मनोज कसाब हे राखीव जागेवर विजयी झाले होते. त्यानंतर ९ ग्रा.पं. सदस्य असलेल्या सरपंच पदाकरीता त्यांची निवड झाली. मनोज हे अविवाहित होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, ६ भाऊ, २ बहिणी असा मोठा परिवार आहे. (प्रतिनिधी)