लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : औषधींसाठी निधी नाही, यंत्रसामुग्री, फर्निचरसाठी निधी नाही, अशी ओरड करणाºया घाटी रुग्णालयाच्या खात्यात पाच विभागांच्या श्रेणीवर्धनासाठी आलेला २.५४ कोटींचा निधी प्रशासकीय मान्यतेअभावी सहा वर्षांपासून पडून आहे. तीन अधिष्ठाता बदलून गेले; परंतु निधी खर्च करण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळविण्यासाठी कोणीही हालचाली केल्या नाहीत. त्यामुळे तब्बल सहा वर्षांपासून हा निधी पडून आहे.शल्यचिकित्साशास्त्र, अस्थिव्यंगोपचारशास्त्र, बधिरीकरणशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र आणि औषधशास्त्र या विभागांसाठी हा निधी मिळाला आहे. यामध्ये इमारतींमधील गळती रोखणे, खिडक्या, फरशी, विद्युतीकरण अशी बांधकामासंदर्भातील नूतनीकरणाची कामे केली जाणार आहेत. सूक्ष्मजीवशास्त्र, औषधशास्त्र विभागात प्रयोगशाळेचे काम केले जाणार आहे. २०११ मध्ये मिळालेल्या २.५४ कोटींच्या निधीत सर्वाधिक निधी म्हणजे १ कोटीचा निधी हा घाटीतील शल्यचिकित्साशास्त्र विभागाच्या नूतनीकरणासाठी मिळाला आहे. या विभागात आजघडीला अनेक समस्या आहेत. निधी मिळूनही कामे होत नसल्याने समस्या जैसे थे आहे. त्याचा परिणाम रुग्णसेवेवर होतो.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची (घाटी) उभारणी होऊन ४० वर्षे लोटली आहे. मराठवाड्यासह लगतच्या भागातील गोरगरीब रुग्णांसाठी घाटी जीवनवाहिनी ठरत आहे; परंतु गेल्या अनेक वर्षांत येथील इमारतींच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामाकडे शासनाने कानाडोळा केला आहे. निधीची नुसती प्रतीक्षा करावी लागते. केंद्र आणि राज्य शासनाकडून विशेष निधी दिला जातो. हा निधी खर्च करण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळणे आवश्यक असते; परंतु ही मान्यता मिळत नसल्याने सहा वर्षांपासून पाच विभागांचे श्रेणीवर्धन रखडले आहे. ही प्रशासकीय मान्यता लवकरच मिळेल, असे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर म्हणाल्या.
सहा वर्षांपासून २.५४ कोटी निधी पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:48 IST