एसआरएफ निधीची घातली सांगड

By Admin | Updated: July 4, 2014 00:15 IST2014-07-03T23:44:16+5:302014-07-04T00:15:58+5:30

चेतन धनुरे , लातूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने बनवेगिरी उघड होण्याच्या शक्यतेने एसआरएफच्या निधीची कशीबशी सांगड घातल्याचाही आरोप केला जात आहे़

The fundraising of the SRF fund | एसआरएफ निधीची घातली सांगड

एसआरएफ निधीची घातली सांगड

चेतन धनुरे , लातूर
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने बनवेगिरी उघड होण्याच्या शक्यतेने एसआरएफच्या निधीची कशीबशी सांगड घातल्याचाही आरोप केला जात आहे़ अगदी ५०० मीटर अंतराच्या कामालाही १५ लाख रुपयांचा निधी तर ३ किमी अंतराच्या कामालाही १५ लाख रुपये खर्च झाल्याचे बांधकाम विभागानेच दिलेल्या माहितीतून समोर आले आहे़
ई-निविदा प्रक्रियेपासून लांब राहत मर्जीतील गुत्तेदारांना काम मिळावे यासाठी केवळ १ किमी अंतराचेही चार-चार तुकडे पाडून त्यावर प्रत्येकी ५ लाख रुपयांचा निधी खर्चण्यात आले आहेत़ इतकेच नव्हे तर आता गेल्या आर्थिक वर्षात एसआरएफअंतर्गत प्राप्त झालेल्या जवळपास १४ कोटी ८७ लाख रुपयांचाही कसाबसा मेळ घालण्यात आल्याचे दिसून येत आहे. एकिकडे वित्त विभागाने १६० रस्ते कामांची बिले काढली आहेत. तर बांधकाम विभागाने दिलेल्या यादीनुसार १०८ कामेच झाल्याचा दावा करण्यात येत आहे. मग या दोन विभागांपैकी खरी माहिती कोणाची, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. याची तपासणी होऊन चुकीची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणीही सभागृहात करण्यात आली होती. दरम्यान, बांधकाम विभागाने दिलेल्या रस्ते कामांच्या यादीतही बराचसा गोलमाल असल्याचा आरोप करण्यात आला आहे. १४ कोटींहून अधिक निधीची सांगड घालण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे यादीतून स्पष्टपणे दिसत आहे. एकिकडे १, १.५, २ तसेच अगदी ३ किलोमीटरपर्यंतच्या कामांनाही १५ लाख रुपयेच खर्च दाखविण्यात आला आहे. दुसरीकडे अवघ्या ५००, ६००, ६५० मीटर्स रस्ता सुधारण्याच्या कामासाठीही १५ लाख रुपयेच लागल्याचे बांधकाम विभागाने दिलेल्या माहितीतून उघड झाले आहे.
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सरफराजपूर-उमरदरा-हलकी या ६५० मीटर अंतराच्या कामासाठी १५ लाख रुपये, औसा तालुक्यातील समदर्गा ते कोरंगळा या ५०० मीटर अंतराच्या कामासाठी १५ लाख रुपये तसेच पानचिंचोली- दगडवाडी-भंगेवाडी-किनीथोट या ५०० मीटर अंतराच्या कामासाठीही १५ लाख रुपये खर्च झाल्याचे बांधकाम विभाग सांगत आहे. दुसरीकडे रेणापूर तालुक्यातील सांगली-अंदलगाव या ३ किलोमीटर अंतराच्या कामासाठी १५ लाख रुपयेच खर्च आला आहे. म्हणजेच ५०० मीटर अंतराच्या कामासाठी १५ लाख रुपये लागत असतील, तर ३ किलोमीटर अंतराच्या कामाला हा खर्च कसा वाढला नाही, तो १५ लाख रुपयेच कसा राहिला, असे प्रश्नही निर्माण होत आहेत. एकंदरितच, एसआरएफच्या निधीची कशीबशी सांगड घातल्याचेच निदर्शनास येत आहे.
३ किलोमीटर अंतराच्या रस्ते सुधारणा कामासाठी जर १५ लाख रुपये लागतात, तर ५०० मीटर अंतरासाठी १५ लाख रुपयांची आवश्यकता कशी लागते, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जर ३ कि.मी. अंतरावर खड्डे बुजवून डागडुजी करण्यात आल्याचे सांगण्यात येणार असेल, तर एसआरएफच्या निधीतून हे काम करता येत नाही. त्यासाठी गट-ब मधून शासनाची स्वतंत्र तरतूद असल्याचे भाजपा गटनेते रामचंद्र तिरुके यांनी सांगितले. त्यामुळे ही बनवाबनवीच असल्याचे आणखी स्पष्ट झाल्याचेही ते म्हणाले.

Web Title: The fundraising of the SRF fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.