तेर येथील उत्खननासाठी निधी कमी पडू देणार नाही
By Admin | Updated: January 29, 2015 01:14 IST2015-01-29T01:11:44+5:302015-01-29T01:14:46+5:30
तेर : तेरचा इतिहास हा खूप प्राचीन असून, तो थेट सातवाहन काळापर्यंत जातो. त्यामुळे हा इतिहास जिवंत ठेवण्याचे काम पुरातत्व विभाग करत आहे

तेर येथील उत्खननासाठी निधी कमी पडू देणार नाही
तेर : तेरचा इतिहास हा खूप प्राचीन असून, तो थेट सातवाहन काळापर्यंत जातो. त्यामुळे हा इतिहास जिवंत ठेवण्याचे काम पुरातत्व विभाग करत आहे. उत्खननातून आणखी काही ऐतिहासिक बाबी पुढे येण्याची शक्यता आहे. या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली. पुरातत्व विभागाच्या वतीने बुधवारी तेर येथे उत्खननाचे काम डॉ. नारनवरे यांच्या हस्ते सुरु करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
पुरातत्व विभागाच्या दफ्तरी संरक्षित स्थळ व राज्य स्मारक म्हणून नोंद असलेल्या तेर येथील कोट टेकडी आणि बैराग्य टेकडी येथे हे उत्खनन करण्यात येत आहे. यासाठी पुरातत्व विभागाच्या उपसंचालिका माया पाटील, सहाय्यक संचालक विलास वहाणे यांच्यासह १२ तज्ञांची टीम तेरमध्ये दाखल झाली आहे.
कामाच्या शुभारंभप्रसंगी माजी खासदार डॉ.पद्मसिंह पाटील, उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, अमोल गोटे, जया घोळवे, सहाय्यक अभिरेखक प्रवीण शिंदे, तेरच्या सरपंच गिता कोळपे, रेवणसिद्ध लामतुरे, बाळासाहेब वाघ, मुश्ताक काझी विजय फंड, शिवाजी नाईकवाडी आदींची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी रामलिंगप्पा लामतुरे पुराणवस्तू संग्रहालयाची पाहणी करुन माहितीही घेतली. (वार्ताहर)