चौपदरीकरणासाठी निधी मंजूर करणार!
By Admin | Updated: August 20, 2016 00:49 IST2016-08-20T00:41:41+5:302016-08-20T00:49:22+5:30
अंबड : जालना-वडीगोद्री रस्ता चौपदरीकरणासाठी राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात निधी मंजूर करवून घेणार असल्याची ग्वाही भाजपा प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांनी

चौपदरीकरणासाठी निधी मंजूर करणार!
अंबड : जालना-वडीगोद्री रस्ता चौपदरीकरणासाठी राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात निधी मंजूर करवून घेणार असल्याची ग्वाही भाजपा प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांनी अंबड येथे आयोजित कार्यक्रमात दिली. एकमेकांना चिडविण्याच्या नादात या रस्त्याचे चौपदरीकरण रखडले अशी मिश्किल कबुली देत आता मात्र या रस्त्याच्या चौपदरीकरणाची जबाबदारी माझी असून, नागरिकांनी या रस्त्याच्या चौपदरीकरणाविषयी निश्चिंत राहावे , असे सांगत त्यांनी आश्वस्त केले.
रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिकांचे काय हाल होतात, याची आपल्याला पूर्ण कल्पना आहे. जालना-भोकरदन रस्त्याची दुरावस्थेची जाहिरात करुन लोकसभा निवडणुकीत मला पराभूत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आम्हाला पंधरा वर्षे चिडविल्यामुळे आम्हीही एक वर्षे तुम्हाला चिडविले व त्यामुळेच या रस्त्याचे काम रखडल्याची प्राजंळ कबुली खा.दानवे यांनी दिली.
तसेच ड्रायपोर्टसाठी तब्बल १ हजार कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक मिळविण्यात यश आले असून, याद्वारे हजारो तरूणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोरुन जाणारा बायपास रस्ता वगळून शहराबाहेरुन जाणारा अन्य एक बायपास रस्ता तयार करण्यात येणार असून, तो सरळ ड्रायपोर्ट येथे निघेल तसा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविल्याचेही दानवे म्हणाले.
भाजपचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, शहराध्यक्ष सिद्धिविनायक मुळे, माजी आ. विलास खरात, किरण खरात, अवधूत खडके, साहेबराव खरात, रमेश शहाणे, संदीप खरात, औदुंबर बागडे, अरुण उपाध्ये, बबन बुंदेलखंडे, प्रसाद झाडे, गजानन कांबळे, गंगाधर वराडे, प्रकाश दौंड, लालखाँ पठाण, राजेंद्र साखरे, गवारे पाटील आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
४मुंबई-नागपूर हा महत्वाकांक्षी मार्ग जालना शहरापासून केवळ अडीच कि़मी. अंतरावरुन जाणार आहे. यासाठी नवीन जमीन धोरणानुसार अधिग्रहण करण्यात येणार असून, यामध्ये रस्त्यासाठी मूळ मालकाची ७५ टक्के जमीन वापरुन उरलेल्या २५ टक्के जमिनीचा विकास करण्यात येणार आहे. या प्रोजेक्टमध्ये प्रत्येक ६० कि़ मी. च्या अंतरावर पंचतारांकीत शहराची स्थापना होेणार आहे. यानुसार जामवाडीजवळ एक पंचतारांकीत शहर उभारण्यात येणार असून, याद्वारे नागरिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.