औरंगाबादच्या विधि विद्यापीठाला सव्वा कोटीचा निधी
By Admin | Updated: April 20, 2017 22:20 IST2017-04-20T22:20:01+5:302017-04-20T22:20:01+5:30
महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या स्थापनेसाठी राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

औरंगाबादच्या विधि विद्यापीठाला सव्वा कोटीचा निधी
राम शिनगारे / ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 20 - महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या स्थापनेसाठी राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वीच १ कोटी २१ लाख ६५ हजार रुपये निधी पायाभूत सेवा सुविधांसाठी दिला आहे.
औरंगाबादेत महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी अनेक वर्षापासून होत होती. या मागणीला यावर्षी यश मिळाले आहे. विधि विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ.एस. सूर्यप्रकाश यांची नेमणूक होताच सर्व प्रक्रियांना गती मिळाली आहे. राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक घेत शासकीय अध्यापक महाविद्यालयातील सर्व सुविधांचा आढावा घेतला होता. याचवेळी विधि विद्यापीठ सुुरु करण्यासाठी आवश्यक असलेला सर्व निधी उपलब्ध करुन देण्याची घोषणाही करण्यात आली होती. या घोषणेनुसार मार्च महिन्याअगोदर काही निधी उपलब्ध करुन दिला होता. याचवेळी चालू आर्थिक वर्षांत पहिल्यांदाच १ कोटी २१ लाख ६५ हजार रुपये एवढा निधी देण्यात आला आहे. याविषयीचा शासन निर्णय नुकताच काढण्यात आला. या निधीतून विद्यापीठाच्या कुलगुरूंना गाडी, फर्निचरसह इतर पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येणार असल्याचे विद्यापीठाचे विशेष कार्यकारी आधिकारी डॉ. एस. जी. गुप्ता यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.