सेतू सुविधा केंद्राचे कामकाज कोलमडले !

By Admin | Updated: June 25, 2014 01:05 IST2014-06-25T00:20:21+5:302014-06-25T01:05:14+5:30

परंडा : सर्व्हर बंद पडल्यान मागील चार दिवसांपासून येथील सेतू सुविधा केंद्राचे संपूर्ण कामकाज कोलमडले आहे.

The functioning of Setu Facilitation Center collapsed! | सेतू सुविधा केंद्राचे कामकाज कोलमडले !

सेतू सुविधा केंद्राचे कामकाज कोलमडले !

परंडा : सर्व्हर बंद पडल्यान मागील चार दिवसांपासून येथील सेतू सुविधा केंद्राचे संपूर्ण कामकाज कोलमडले आहे. तर दुसरीकडे सेतु केंद्रावर प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पालकांची एकच गर्दी उडाली आहे. केवळ अर्ज देण्यासाठी नागरिकांना एकेक तास रांगेत उभे रहावे लागत आहे. मात्र, सर्वसामान्यांची ही फरफट महसूल विभागाचे अधिकारी उघड्या डोळ्यांनी पाहात आहेत.
दहावी व बारावी परीक्षेचे निकाल नुकतेच लागले आहेत. पुढील शिक्षणास प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू आहेत. त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे तहसील कार्यालयातून काढावी लागतात. यासाठी सेतू सुविधा केंद्रामध्ये अर्ज करावा लागतो. परंतु, या ठिकाणी अर्ज स्वीकारण्यासाठी एकाच टेबलाची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्यांना केवळ अर्ज देण्यासाठी एकेक दिवस खर्ची घालावा लागत आहे. दरम्यान, सातबारा, प्रतिज्ञापत्र, उत्पन्नाचा दाखला घेण्यासाठी एक व जातीचे प्रमाणपत्र, नॉनक्रिमिलेअर, राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र काढण्यासाठी एक अशा दोन टेबलांची गरज नागरिकांतून व्यक्त होत आहे. एखाद्या प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल केल्यानंतर १५ दिवसांत संबंधित प्रमाणपत्र मिळत नाही. याचा फटकाही विद्यार्थ्यांसोबतच सर्वसामान्य ग्रामस्थांना बसत आहे. कोणत्या प्रमाणपत्रासाठी कोणती कागदपत्रे जोडावीत, याचा फलकही सेतू केंद्राबाहेर लावण्यात आलेला नाही. तर अर्ज स्वीकारताना आवश्यक यादीपेक्षाही अधिक कागदपत्रे मागितली जात असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांतून होत आहे. दरम्यान, उपविभागीय पाठविल्या जात असलेल्या अर्जांमध्ये मोठ्या प्रमाणत त्रुटी निघत असल्याचे म्हणणे आहे. त्यामुळे अर्ज प्रलंबित राहण्याचे प्रमाण वाढले आहे. असे असतानाचा प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे अर्जाचे नमुने तहसील परिसरातच चढ्या दराने विकून नागरिकांना लुबाडले जात आहे. नागरिकांच्या या हालअपेष्टांकडे लक्ष द्यायला महसूल अधिकाऱ्यांना सवड मिळणा कधी? असा प्रश्नही या निमित्ताने विद्यार्थी, पालकांतून उपस्थित केला जावू लागला आहे. (वार्ताहर)
डेडलाईन केवळ नावालाच...
सेतू केंद्रात अर्ज दाखल केल्यानंतर किमान १५ दिवसांत कोणतेही प्रमाणपत्र मिळणे आवश्यक आहे. मात्र, येथील सेतू केंद्रातून पावतीवरील तारीख उलटून गेल्यानतंरही प्रमाणपत्र मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसह त्यांचे पालकांचे हाल होत आहेत. त्याचप्रमाणे वेळ आणि पैसा नाहक र्खच होतो आहे. सध्या शेतकरी व विद्यार्थ्यांची या केंद्रावर जादा गर्दी दिसते. त्यामुळे प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपत एक-दोन महिन्यांसाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करुन देण्याची मागणी होत आहे.
विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ संतप्त
चार दिवसांपासून सर्व्हर जॅम झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसोबतच अन्य ग्रामस्थही त्रस्त झाले आहेत. सोमवारी तहसीलदार उपस्थित नसल्याने थेट नायब तहसीलदार पांडळे यांचे दालन गाठले. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी त्यांच्यावर तक्रारींचा पाऊस पाडला. कार्यालयातील मंडळी पाठीमागच्या दरवाजातून ‘खास’ मंडळीचे अर्ज स्वीकारतात, अशी तक्रारही केली. याकडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
परंडा शहरात सहा आणि ग्रामीण भागात सहा असे एकूण १२ महा-ई-सेवा केंद्र सुरू आहेत. या केंद्राद्वारेही कागदपत्रांसाठी अर्ज करता येताता. महा-ई-सेवा केंद्रधारक अगाऊ रक्कमेची आकारणी करीत असल्यास त्यांच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे नायब तहसीलदार एस.एस. पाडळे यांनी सांगितले.

Web Title: The functioning of Setu Facilitation Center collapsed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.