‘वीक एण्ड’च्या पावसात म्हैसमाळला फुल टू धमाल

By Admin | Updated: July 21, 2014 00:35 IST2014-07-21T00:18:35+5:302014-07-21T00:35:59+5:30

औरंगाबाद : पहाटेच ढगांनी शहरावर गर्दी केली होती... ढग एवढे दाटून आले होते की, सूर्यदर्शन घडले नाही

Full-to-Dummy | ‘वीक एण्ड’च्या पावसात म्हैसमाळला फुल टू धमाल

‘वीक एण्ड’च्या पावसात म्हैसमाळला फुल टू धमाल

औरंगाबाद : पहाटेच ढगांनी शहरावर गर्दी केली होती... ढग एवढे दाटून आले होते की, सूर्यदर्शन घडले नाही. या वातावरणाने अनेकांची मने प्रफुल्लित झाली होती. रविवारची सुटी निसर्ग सान्निध्यात घालवावी, असा विचार अनेकांनी मनाशी पक्का केला.
सहलीचा बेत ठरला अन् औरंगाबादकरांनी सकाळीच दौलताबाद, म्हैसमाळकडे आगेकूच केली. अधूनमधून येणाऱ्या रिमझिम पावसाने तर तरुणाई बहरली होती. युवक- युवतींचे जथेच्या जथे ‘फुल टू धमाल’ करीत दुचाकीवर भरधाव जात होते. एवढेच नव्हे तर सहपरिवार येणाऱ्यांची संख्याही काही कमी नव्हती. पावसात मनसोक्त नृत्य करीत अनेकांनी फोटोसेशनही करून घेतले. लपंडावपासून कबड्डीपर्यंत अनेक खेळ खेळले, डबा पार्टीही झाली. दिवसभर मौज, मस्ती, धमाल करीत रविवार ‘सहली’च्या नावावर करून टाकला.
मराठवाड्यातील महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध असणारे म्हैसमाळ रविवारी शहरवासीयांनी तुडुंब भरले होते. कोणी म्हैसमाळच्या तलावात पोहत होते, एकमेकांच्या अंगावर पाणी उडवीत होते, कोणी नेक्लेस पॉइंटवर उभे राहून निसर्गाचे सौंदर्य न्याहाळत होते. नजर जाईल तिकडे धुके... हिरवाई दिसत होती... अधूनमधून पडणाऱ्या रिमझिम पावसात चिंब भिजण्याचा मोह तरुणाईला सोडाच; पण ज्येष्ठांनाही आवरता आला नाही. ढगाळ वातावरणात रविवारचा दिवस निसर्गाच्या सान्निध्यात घालविण्यासाठी शहरवासीयांची पावले सकाळी ९ वाजेपासूनच म्हैसमाळच्या दिशेने निघाली होती.
दौलताबादच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकी, चारचाकींची गर्दी वाढली होती. सर्वप्रथम सर्वांचे आकर्षणाचे केंद्र होते दौलताबादचा घाट, येथील व्ह्यू पॉइंटवर उभे राहून खोल दरी, विस्तीर्ण तलाव, हिरवेगार वनराईचा आनंद सर्वजण लुटत होते. येथील व्ह्यू पॉइंटवर उभारण्यात आलेल्या लोखंडी पाईपवर उभे राहून तरुण मोठ्याने ओरडत जल्लोष करीत होते. या व्ह्यू पॉइंटवर उभे राहून अनेक जण फोटोसेशन करून घेत होते. रिमझिम पावसात गरम कणसे खाण्याचाही मोह कोणी टाळू शकत नव्हते. यानंतर म्हैसमाळला जाण्यासाठी दौलताबादच्या दिशेने भरधाववेगाने गाड्या नेण्यात येत होत्या. काही कॉलेजचे विद्यार्थी एकाच दुचाकीवर डब्बल, ट्रिपल सीट आले होते. म्हैसमाळच्या दिशेने जातानाच निसर्गरम्य परिसर आणि सरळ रस्ता यामुळे दुचाकीस्वरांना तर हे वातारवरण अवतणच ठरत होते. दुचाकीवर पाठीमागील बाजूस बसलेले युवक उभे राहून स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करीत होते. कारमधील स्पीकरचा आवाज मोठा करीत गाण्याचा आनंद लुटत होते.
म्हैसमाळकडे जाणाऱ्या छोट्याशा; पण नागमोडी घाटावरही अनेक जण उभे राहून फोटोसेशन करीत होते. काही जण घाटाच्या कठड्यावर बसून नागमोडी घाटाचे सौंदर्य डोळ्यात साठवून घेत होते. म्हैसमाळचा तलाव तर अबालवृद्धांना आकर्षित करीत होता. यात कॉलेजकुमार तर थेट पाण्यात उतरून एकमेकांवर पाणी फेकण्यात तल्लीन झाले होते. त्यात पाऊस सुरू झाला तर मस्ती आणखी वाढत होती. तलावाच्या काठावर अनेक जोडपे आपल्या जोडीदाराचे फोटो मोबाईल कॅमेऱ्यात कैद करीत होते. म्हैसमाळच्या नेक्लेस पॉइंटवर राजस्थानी गर्लस् हॉस्टेलच्या विद्यार्थिनींनी धमाल केली. रिमझिम पावसात भिजण्यापासून ते सामूहिक नृत्य करण्यापर्यंत खऱ्याअर्थाने एन्जाय केला जात होता. काही कॉलेजियन गटागटांनी येथे आले होते. एकमेकांना भिजविण्यात आणि फोटोसेशन करण्यात सर्व दंग होते. महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणाचे कर्मचारीही येथे आले होते. त्यांनी दैनंदिन ताणतणावातून मुक्त होत सुटीचा आनंद लुटाला. अनेक जण सहपरिवार आले होते. निसर्गाच्या सान्निध्यातच स्वयंपाक करून अनेकांनी वनभोजन केले. म्हैसमाळाला दुचाकी व चारचाकी वाहनांची मोठी गर्दी झाली होती.
२ हजार लोकांची हजेरी
उपवन संरक्षक ए.डी. भोसले आज खुद्द म्हैसमाळच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी सांगितले की, दिवसभरात २ हजार लोकांनी म्हैसमाळला भेट दिली. महिनाभराच्या दडीनंतर पावसाने पुन्हा हजेरी लावली आणि आज रविवारी पर्यटकांनी म्हैसमाळला गर्दी केली.
पावसाचा जोर असाच राहिला तर येणारे शनिवार व रविवार गर्दीचा विक्रम मोडणारे ठरतील. सायंकाळी वाहने मोठ्या प्रमाणात आली होती. यामुळे एकच गर्दी झाली. वाहनांना पार्किंगसाठी वेगळी व्यवस्था करण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना दिले आहेत.
शहरातील डोंगरे परिवारही येथे आला होता, ज्येष्ठ महिला स्वयंपाक करीत होत्या, तर अन्य सदस्य विविध खेळ खेळत होते.

Web Title: Full-to-Dummy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.