जिल्ह्यातील ४० पेट्रोल पंपांवर इंधन समस्या
By Admin | Updated: August 1, 2014 01:08 IST2014-08-01T00:55:41+5:302014-08-01T01:08:34+5:30
औरंगाबाद : तीन पेट्रोलियम कंपन्यांचे मिळून जिल्ह्यात १७५ च्या जवळपास पेट्रोलपंप आहेत.
जिल्ह्यातील ४० पेट्रोल पंपांवर इंधन समस्या
औरंगाबाद : तीन पेट्रोलियम कंपन्यांचे मिळून जिल्ह्यात १७५ च्या जवळपास पेट्रोलपंप आहेत. त्यातील एचपीसीएलच्या ४० पेट्रोलपंपांना गेल्या आठवड्यापासून पेट्रोल व डिझेलचा पुरवठा उशिराने होऊ लागला आहे. या पंपांवर कधी पेट्रोल संपते, तर कधी डिझेल. यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
मनमाडजवळील पानेवाडी येथे बीपीसीची पाईपलाईन आहे. मुंबईहून ही पाईपलाईन पानेवाडीपर्यंत आणण्यात आली आहे. या ठिकाणी बीपीसी, एचपीसीएल व आयओसीचे या पेट्रोलियम कंपन्यांचे डेपो आहेत. पेट्रोलपुरवठा करणाऱ्या बीपीसीच्या पाईपलाईन दुरुस्तीचे काम कंपनीने हाती घेतले तसेच मुंबई येथील एचपीसीएलच्या रिफायनरीमध्ये शटडाऊन सुरू झाल्यामुळे याचा परिणाम पेट्रोल, डिझेलच्या पुरवठ्यावर झाला. बीपीसीने रतलाम येथून पेट्रोल- डिझेल आणून त्याचा पुरवठा केला. मात्र, एचपीसीएलच्या पेट्रोल पंपवाल्यांना पानेवाडीऐवजी वाशी व लोणी येथील डेपोतून पेट्रोल- डिझेल आणावे लागत आहे. त्या डेपोच्या हद्दीतील पेट्रोल पंपवाल्यांना इंधन दिल्यानंतर मग औरंगाबादेतील पेट्रोल पंपवाल्यांच्या गाड्या भरल्या जात आहेत. यामुळे गाड्या येण्यास दोन ते तीन दिवसांचा उशीर होत आहे. परिणामी, बुधवारी शहरातील एचपीसीएलचे ५ पेट्रोल पंप कोरडे पडले होते. जिल्ह्यातील ४० पेट्रोल पंपांवर हीच परिस्थिती होती. मात्र, गुरुवारी शहरातील त्या ५ पेट्रोल पंपांवर पेट्रोलने भरलेल्या गाड्या आल्यात. मात्र, जिल्ह्यातील एचपीसीएलच्या काही पंपांवर पेट्रोल होते, डिझेल नव्हते, तर काही पेट्रोल पंपांवर डिझेल होते, तर पेट्रोल संपले होते. काही पेट्रोल पंप कोरडे पडले होते. यासंदर्भात पेट्रोल पंप डीलर्स असोसिएशनचे सचिव अकील अब्बास यांनी सांगितले की, जिल्ह्यातील एचपीसीएलच्या ४० पेट्रोल पंपांवर रोज दीड ते दोन लाख लिटर पेट्रोल व सुमारे ५ लाख लिटर डिझेलची आवश्यकता असते. गेल्या आठवड्यात रोज फक्त २५ टक्केच आवक होत असल्यामुळे पंप कोरडे पडले.
दोन दिवस लागतील
एचपीसीएलचे विक्री अधिकारी प्रेमसिंग यांनी सांगितले की, पानेवाडी डेपोतील पाईपलाईनची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. तसेच मुंबईतील रिफायनरी पूर्ववत सुरू झाली आहे.
आज औरंगाबादेत एचपीसीएलच्या काही पंपांवर पेट्रोल-डिझेलचा पुरवठा झाला. शुक्रवारी ग्रामीण भागातील पंपावरही पेट्रोल-डिझेल पोहोचेल. पुरवठा सुरळीत होण्यास दोन दिवस लागतील.
ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष
वाळूज येथील पेट्रोल पंप मालक आनंद संचेती म्हणाले की, गेल्या तीन दिवसांपासून पेट्रोलचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे आमचा पेट्रोल पंप कोरडा होता. शहरात ओरड होत असल्यामुळे तेथे लगेच पेट्रोल पाठविले जाते; परंतु ग्रामीण भागातील पंपांकडे कंपन्यांचे दुर्लक्ष होते.