दारूबंदासाठी महिलांचा ठाण्यावर मोर्चा
By Admin | Updated: August 22, 2014 00:18 IST2014-08-21T23:16:09+5:302014-08-22T00:18:20+5:30
वसमत : तालुक्यातील पळसगावातील अवैध दारुविक्री बंद करून दारुड्यांच्या त्रासातून मुक्त करण्याच्या मागणीसाठी गावातील महिला व ग्रामस्थांनी थेट ग्रामीण पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला.

दारूबंदासाठी महिलांचा ठाण्यावर मोर्चा
वसमत : तालुक्यातील पळसगावातील अवैध दारुविक्री बंद करून दारुड्यांच्या त्रासातून मुक्त करण्याच्या मागणीसाठी गावातील महिला व ग्रामस्थांनी थेट ग्रामीण पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला. दौऱ्यावर आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांचीही महिलांनी भेट घेवून गाऱ्हाणे मांडले. यावरुन ग्रामीण भागात अवैध दारुने किती कहर केलाय, हे पहावयास मिळते.
वसमत तालुक्यात ‘गाव तेथे दारुचे दुकान’ हे समीकरण होवून बसले आहे. वसमतमधून दुचाकीवर दारुचे खोके घेवून प्रत्येक गावा-गावात दारु पार्सलच्या नावाने पोहोचली जाते. राष्ट्रीय महामार्गावरून खुलेआम दारु जात असली तरी पोलिसांच्या नजरेस दुचाकीस्वार का पडत नाहीत, हा प्रश्न कायमच राहतो.
डिलिव्हरी मिळत असल्याने गावात दारुअड्डे तयार झाले व दारुड्यांनी धुमाकुळ घालण्यास सुरूवात केली आहे. याचवेळी उपविभागीय अधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आले असल्याची माहिती मिळाली. त्यावेळी गावातील दारुमुळे उद्भवलेली परिस्थिती कथन केली.
शिष्टमंडळासोबत व्यसनमुक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष दासराव कातोरे, तंटामुक्तीचे डाखोरे, सरपंच, ग्रा. पं. सदस्य व ग्रामस्थांसह महिलांची उपस्थिती होती. गावात दारुच्या नशेपाई गेल्या दोन वर्षात किमान १० तरुणांचे निधन झाल्याची माहिती व्यंकटी पानधोंडे, ज्ञानेश्वर पानधोंडे, गणेश मिरकुटे आदींनी सदर प्रतिनिधीशी बोलताना दिली. आता ग्रामस्थांनी दारु विरोधात लढा उभारण्याचा निर्णय घेतल्याने अवैध दारूविक्रेते चांगलेच हादरले आहेत.(वार्ताहर)