कारखान्यावर धडकला ऊस उत्पादकांचा मोर्चा
By Admin | Updated: June 27, 2014 00:07 IST2014-06-26T23:33:08+5:302014-06-27T00:07:53+5:30
पाथरी : रेणुका शुगर कारखान्याचा चालू वर्षाचा गळीत हंगाम सुरू करवा यासाठी सर्वपक्षीय शेतकरी, ऊस उत्पादकांचा मोर्चा काढण्यात आला.

कारखान्यावर धडकला ऊस उत्पादकांचा मोर्चा
पाथरी : रेणुका शुगर कारखान्याचा चालू वर्षाचा गळीत हंगाम सुरू करण्यात यावा यासाठी माजी आ. हरिभाऊ लहाने यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शेतकरी, ऊस उत्पादकांचा मोर्चा २६ जून रोजी कारखान्यावर काढण्यात आला.
पाथरी येथील रेणुका शुगर कारखाना गतवर्षी सुरू झाला नव्हता. यावर्षी या भागात मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड झाली असल्याने कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होणे आवश्यक आहे.
कारखाना प्रशासनाकडून कारखाना सुरू करण्याच्या दृष्टीने हालचाली होत नसल्याने पाथरी, मानवत, सेलू या भागातील शेतकऱ्यांनी कारखाना सुरू करावा यासाठी माजी आ. हरिभाऊ लहाने यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय आंदोलन करण्याची भूमिका घेतली. २६ जून रोजी सकाळी ११ वाजता शहरातील मोंढा परिसरातून हा मोर्चा निघून तहसील कार्यालय, सेलू कॉर्नर परिसर मार्गे येऊन कारखान्यावर धडकला.
या मोर्चामध्ये माजी आ. हरिभाऊ लहाने, लक्ष्मणराव टेंगसे, अशोक गिराम, प्रल्हाद चिंचाणे, प्रभाकर शिंदे, विजय पाटील सिताफळे, पप्पू घांडगे, सर्जेराव गिराम, रंगनाथ वाकनकर, नानासाहेब वानकर, गंगाधर कदम, गोविंद गायकवाड, कॉ. दीपक लिपणे, लिंबाजी कचरे, अॅड. जाधव, अॅड. गिराम, दत्ता बुलंगे, कल्याण गिराम, उदय चिटणीस, मुखीद जहागीरदार, गंगाधर पितळे आदी सहभागी झाले होते.
कारखाना स्थळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना हरिभाऊ लहाने यांनी कारखान्याचा गळीत हंगाम सुरू करण्यासाठी हे पहिले पाऊल असूून आठ दिवसाच्या आत याबाबत निर्णय झाला नाही तर रस्त्यावर ऊतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला. प्रभाकर शिंदे, प्रल्हाद चिंचाणे, कॉ. कचरे, लक्ष्मणराव टेंगसे यांचे मार्गदर्शन झाले. प्रास्ताविक विजय पाटील सिताफळे यांनी केले.
मोर्चेकऱ्यांनी कारखान्याचे व्यवस्थापकांना मागण्यासंदर्भात निवेदन देऊन याबाबत तातडीने पावले उचलण्याबाबत कळविले आहे. मोर्चासाठी स्थानिक पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. तसेच या मोर्चात दुचाकीस्वारांनी त्यांच्या गाड्यांना ऊस लावला होता. यामुळे या मोर्चाचे आकर्षण वाढले.
(वार्ताहर)
कारखाना सुरू करण्यास भाग पाडू
पाथरी येथील रेणुका शुगर कारखाना कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर ऊस उपलब्ध आहे. कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाला नाही तर या भागातील शेतकरी अडचणीत सापडले जाणार आहेत. यामुळे ऊस उत्पादकांच्या सहकार्यावर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू करण्यास प्रशासनाला आपण भाग पाडूत, असा इशारा आंदोलनाचे नेतृत्व करणारे माजी आ. हरिभाऊ लहाने यांनी यावेळी दिला.
शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती
खरीप हंगामाच्या तोंडावर पावसाने दगा दिला. यामुळे पेरण्या खोळंबून पडल्या. शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. यातच उसाचीही चिंता लागू नये म्हणून पाथरी तालुक्यासोबतच मानवत व सेलू तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखाना प्रशासनावर आयोजित केलेल्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी शेतकरी, ऊस उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.